नवऱ्याची किंमत 1 लाख; चंद्रपुरात पत्नीकडून स्वत:चंच कुंकू पुसण्याची सुपारी, शाळेच्या परिसरात आढळली बॉडी

पत्नीने एक लाख रुपयांची सुपारी देत शिक्षक पतीची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ही घटना भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चार आरोपींना अटक केली आहे. रवींद्र तुळशिराम कुळमेथे (वय ४६) रा. गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे. तर पत्नी दीपमाला कुळमेथे, वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी असे आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृताची ओळख पटवली. प्राथमिक तपासात हा आकस्मिक मृत्यू वाटत असला तरी सखोल चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. मृतकाची पत्नी दीपमाला कुळमेथे हिनेच पतीच्या खुनासाठी वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी यांना १ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले.

भद्रावती पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपी दीपमाला कुळमेथे व वर्षा परचाके यांना वरोरा येथून, तर सोनू उर्फ प्रवीण कालोकर व नाझीर अंसारी यांना नागपूर येथून अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार व तीन मोबाइल जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

कारमध्ये आवळला गळा १ मे रोजी आरोपींनी मृतकाला
१ मे रोजी आरोपींनी मृतकाला कारमध्ये बसवून घोडपेठ येथील सुनसान ठिकाणी नेले. तेथे कारमध्येच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला आणि मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले. रवींद्र हा गडचिरोली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होता. मात्र मागील दीड वर्षांपासून तो शाळेत जात नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते व त्यातच तो पत्नीला मारझोड करीत त्रास देत असल्याचे पत्नीने सांगितले. त्यामुळे त्रस्त होऊन तिने हे पाऊल उचलण्याची कबुली दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *