पुण्यातील भोर येथील नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपीने कोर्टात विचित्र दावा केला आहे. आरोपी भीमराव कांबळेने आधी पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला. भीमराव कांबळेची नेहमीच लहान मुलींवर वाईट नजर असायची अशी माहितीपोलिसांच्या तपासात समोर आली. चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याचं आरोपीने पोलिसांसमोर कबूल केलं. तसेच भीमराव कांबळी हा विकृत असल्याचंही तपासात समोर आलं. मात्र असं असतानाही भीमराव कांबळेने न्यायालयामध्ये अगदी अजब दावा केला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी कोर्टात काय म्हणाला?
काल दुपारी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं होतं. नराधम आरोपीने कोर्टात अजब दावा करताना, “मला किरकोळ मारामारीसाठी अटक करण्यात आली आहे,” असं म्हटलं आहे. कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने आरोपीला, “तुमची नेमकी काय केस आहे माहिती आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भीमराव कांबळेने कोर्टासमोर, “सर ही मारामारीची किरकोळ केस आहे,” असं निर्लज्जपणे सांगितलं.
कोर्टाने पोलिसांना झापलं
शनिवारी दुपारी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं होतं. पोलिसांना देखील कोर्टाने झापले. रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे न टाकल्याने कोर्ट पोलिसांवर नाराज झालं. त्यानंतर पोलिसांना कोर्टात 15 मिनिटं देण्यात आली. या 15 मिनिटात रिमांड कॉपीमध्ये पुन्हा बदल करण्यात आला.
एसआयटी स्थापन
नसरापूर घटनेच्या तपासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजेच एसआयटी तयार करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर घटनेच्या तपासाठी सरकारकडून हालचाली वाढल्या असून एसआयटीमध्ये असलेल्या एकूण 6 जणांमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एसआयटीमध्ये समावेश आहे.
आरोपीकडे काय सापडलं?
आरोपीच्या खिशात 5 सेट मॅक्स कंपनीचे ब्लेड्स, एक डायरी, रूमाल आणि 120 रुपये रोख, आधार कार्ड इत्यादी मुद्देमाल मिळून आल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या रिमांड कॉपीमध्ये दिली आहे.
रिमांड कॉपीसाठी पोलिसांनी काय कारणं दिली?
पोलीस कोठडीसाठी पोलिसांनी कोर्टात रिमांड कॉपीत 7 कारणं दिली आहेत. चिमुकली मारण्यासाठी आरोपीने कोणतं हत्यार वापरलं याचा शोध घ्यायचा आहे? तसंच यापूर्वी चिमुकलीस किती वेळा भेटलाय? याचा शोध घ्यायचा आहे असं पोलिसांनी सांगितलं. या गुन्ह्यानंतर आरोपी कुठे वास्तव्यास होता? यापूर्वीही आरोपीने अशाच प्रकारचे गुन्हे केलेत का? याचाही शोध घ्यायचा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पीडितेच्या कुटुंबाचं आवाहन अन् जरांगेंनी रद्द केला दौरा
पीडित कुटुंबियांनी राजकारण्यांनी भेटीसाठी येऊ नये, असं आवाहन केल्यानंतर जरंगे पाटील यांनी पुण्यातील दौरा रद्द केलाय. ते काल सांयकाळी नाशिकच्या दिशेने रवाना झाले. नसरापूर पीडित कुटुंबियांच्या आवाहनाला मनोज जरांगे यांचा ता्त्काळ प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. पीडित कुटुंबियाला भेटण्यासाठी जरांगे पुण्याला येणार होते. मात्र कुटुंबाच्या विनंतीला मान देत त्यांनी दौरा रद्द केला.
मृतदेहाचे शवविच्छेदन इन कॅमेरा
नसरापूर लैंगिक अत्याचार खून प्रकरणात मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात आलं. लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणातील मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सासून रुग्णालयात करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया ‘इन कॅमेरा’ करण्यात आलीय प्राथमिक अहवाल पोलिसांकडे देण्यात आला आहे. न्यायवैद्यक विभागात ही प्रक्रिया गोपनीय पद्धतीने पार पडली. अंतर्गत अवयवांचे नमुने तपासणीसाठी ठेवण्यात आले असून, ते पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. येल्लपा जाधव यांनी सांगितले. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, कडक कारवाईचे निर्देश
नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि त्यानंतर तिची हत्या ही घटना अत्यंत वेदनादायी, हृदयद्रावक आणि संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे. हा मानवतेवरचा कलंक आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या गंभीर घटनेची दखल घेत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला पत्र पाठवून आवश्यक आणि तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच, कठोर POCSO कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यापासून ते विशेष जलदगती न्यायालयातील सुनावणीपर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची शिफारस केली आहे, जेणेकरून वेळेत न्याय मिळू शकेल. अशा प्रकरणांत पीडितेला न्याय मिळवून देणे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळवून देणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
