पनवेलजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक अत्यंत विचित्र अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका पाच महिन्यांच्या चिमुकल्याने आपला प्राण गमावला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ओलांडण्याचा प्रयत्नात असलेल्या एका महिलेच्या पाच महिन्यांच्या बाळाचा जीव गेला. महिलेच्या पाठीवर बांधलेल्या बाळाला, पादचाऱ्यांच्या वाहतुकीवर बंदी असलेल्या या अतिवेगवान मार्गावर एका कारने धडक दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली घटना
पादचाऱ्यांच्या वाहतुकीस सक्त मनाई असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी नवीन पनवेलमधील अडैगावजवळ रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना महिलेचा गंभीर अपघात घडला. या गंभीर अपघातात पाच महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
महिला कोण? चालक कोण?
खांडेश्वर पोलिसांच्या माहितीनुसार, अडैगाव येथील रहिवासी आणि मजूर असलेली सुवर्णा शंकर काळे (24) ही महिला बाळाला पाठीवर बांधून पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना कारने तिला धडक दिली. अपघात घडला तेव्हा अंधेरी (पूर्व) येथील रहिवासी असलेला संकेत बलवंत चव्हाण (29) हा कार चालवत होता. तो मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आपल्या मालकासोबत मुंबईकडे प्रवास करत होता.
द्रुतगती मार्ग का ओलांडण्याचा प्रयत्न केला?
खांडेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी सांगितले की, त्या महिलेने द्रुतगती मार्ग का ओलांडण्याचा प्रयत्न केला याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. “ती द्रुतगती मार्ग का ओलांडत होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे,” असे त्या म्हणाल्या.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघाताची आकडेवारी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरुन रोज लाखो गाड्या प्रवास करतात. अगदी मालवाहू गाड्यांपासून ते छोट्या कार्सपर्यंत हजारो गाड्या एका वेळी या मार्गावर असतात. 2025 मध्ये या संपूर्ण वर्षात 68 जणांचा मृत्यू झाला आहे. 2024 मध्ये ही संख्या 90 इतकी होती. म्हणजेच 2025 मध्ये मृतांची संख्या 22 टक्क्यांनी कमी झाली. 2025 मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 187 अपघात झाले. 2024 मध्ये ही संख्या 191 इतकी होती. म्हणजेच 2025 मध्ये अपघातांची संख्या 2 टक्क्यांनी कमी झाली. 2025 मध्ये या मार्गावर 60 प्राणघातक अपघात झाले जे 2024 च्या 74 अपघातांपेक्षा संख्येनं कमी होते. या साऱ्या अपघातांमध्ये 2025 मध्ये एकूण 140 जण जखमी झाले.
