बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. सुनेत्रा पवारांनी पोटनिवडणूक जिंकत भारतातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. सुनेत्रा पवारांना एकूण 2 लाख 18 हजार 930 मतं मिळाली आहेत. यासह त्यांनी अजित पवारांच्या सर्वात मोठ्या विजयाचा रेकॉर्ड मोडला आहे. या विजयानंतर जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना, मतदारांचे आभार मानले आहेत. निवडणुकीच्या काळात रात्रंदिवस मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि मतदान केंद्रांवरील प्रतिनिधींचेही त्यांनी आभार मानले आहेत.
“मी सर्व बारामतीकरांचे मनापासून आभार मानतो. दादांसाठी त्यांनी निवडणूक मनावर घेतली आणि इतिहास घडवला. त्यांनी दादांच्या प्रेमासाठी हे केल्याने त्यांचे आभार मानतो,” असं जय पवार यांनी म्हटलं आहे. सर्वांनी एकत्र येत कष्ट घेतले आहेत. कार्यकर्ते, पोलिंग एजंट सर्वांनी मेहनत घेतली आहे. त्यांचे आभार मानतो असं त्यांनी सांगितलं.
सुनेत्रा पवारांनी जल्लोष न करण्याचं आवाहन केल्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, “दादांशिवाय निवडणुकीला सामोरं जावं लागेल असं वाटलं नव्हतं. पण नियतीमुळे झालं. तसंच दोन दिवसांपूर्वी भोरमध्ये वाईट घटना घडली आहे. त्यामुळे आम्हाला आनंदाचा दिवस वाटत नाही. वहिनींना तातडीने कशाप्रकारे न्याय मिळेल हे पाहिलं. मीदेखील जल्लोष करु नका अशी विनंती करतो”.
2029 ची ही तयारी आहे का? असं विचारलं असता त्यांनी म्हटलं की, “2029 मध्ये लोकांची आशा आहे असं सांगितलं होतं. 2029 ची तयारी सुरु आहे असं काही नाही. दादा एक आधार होते, वहिनी जेव्हा मुंबईत असतील तेव्हा आधार देत काम केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे”.
लोकांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रत्येक गुरुवारी ‘जनता दरबार’ आयोजित करण्याची घोषणा केली आहे. आधी त्यांनी मंगळवारी जनता दरबार घेण्याचे ठरवले होते, पण सोमवार-मंगळवारी ते मुंबईत असल्याने आता हा दरबार दर गुरुवारी घेतला जाईल.
ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदासंदर्भात त्यांनी सांगितलं की, “आमची सर्वांची इच्छा होती की ते पक्षातच असायला हवं होतं. क्रीडासंदर्भातील अनेकांचे आम्हाला फोन आले. आजचा दिवस महत्व्चा असल्याने त्यासंदर्भात चर्चा करु शकलो नाही. मुख्यमंत्र्यांशी वेळ मिळेल तेव्हा बोलू”.
सर्वांनी ही निवडणूक दादांसाठी हातात घेतली होती. दादांना, वहिनींना सर्वांनी आधार दिला. त्यांनी भविष्यासाठी काही रणनिती ठरली असेल तर त्यांची आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
पक्षाची वाटचाल मी एकटा ठरवू शकत नाही. विलिनीकरणाची दोन पक्षांचं असतं त्यामुळे दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी ठरवलं किंवा चर्चा केली तर तेव्हा पाहू असं ते म्हणाले.
दुष्काळ आणि चाऱ्याचा प्रश्न सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची त्यांना जाणीव 7 मे रोजी आचारसंहिता संपल्यानंतर ते तातडीने पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणार आहेत.
