महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. आता मे महिना सुरु झाला असून हवामानामध्ये मोठा फेरबदल पाहिला मिळत आहे. राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असली तरी काही भागामध्ये उष्णतेची लाट असणार आहे. महाराष्ट्रासह भारतातही भारतीय हवामान विभागाने (IMD) 2 ते 7 मे दरम्यान वायव्य भारतात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दुसरीकडे आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मे महिन्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला असून त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतात सुरू झालेले उष्णतेच्या लाटांचे सत्र मे महिन्यात कमी होणार आहे. तर आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात प्रामुख्याने उष्ण हवामान असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे.
