(Mumbai News) मुंबईचा विकास अतिशय झपाट्यानं होत असतानाच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणारं पुणेसुद्धा या शर्यतीत मागे नाही. देशातील महत्त्वाच्या IT Hub पैकी एक असणाऱ्या या पुण्यातही काही परिसरांचा झालेला विकास आणि कायापालट पाहता डोळे दिपून जात आहेत. यामध्ये आता आणखी एका हॉटस्पॉटची भर पडली आहे, एका अशा परिसराची जिथं प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडण्यास सुरुवात झाली आहे.
कुशमॅन अँड वेकफील्ड’च्या एका अहवालानुसार 2025 च्या चौथ्या तिमाहीमध्ये पुण्यात एकूण 11644 रेसिडेन्शिअल युनिट लाँच झाले. तिमाहीच्या आधारे यामध्ये 8 टक्के आणि वर्षभराच्या आकडेवारीच्या आधारे 13 टक्के वाढ झाली आहे. अहवालानुसार शहरातील वाढती माहणी आणि मालमत्तेच्या दरांमध्ये झालेली वाढ पाहता या कारणामुळं खरेदीदार आता शहरातील मुख्य भागातून निघून उपनगरीय क्षेत्रांची वाट धरत आहेत. पुण्यातील हे क्षेत्र आहे पुनावळे.
पुण्यातील रिअल इस्टेट मार्केटला उसळी…
पुण्यात रिअल इस्टेट क्षेत्रात 43 टक्के लाँचिंग ही मध्यम श्रेणी अर्थात मिड सेगमेंटमध्ये झाली आहे. तर, हाय एंड लक्झरी सेगमेंटचं योगदान 47 टक्के इतकं आहे. प्रिमियम प्रोजेक्टमधील वाढत्या भागिदारीमुळं सरासरी किंमतसुद्धा तिमाहीच्या आधारे 11 टक्क्यांनी वाढून 12303 रुपये प्रति चौरस फुटांवर पोहोचली आहे.
IT क्षेत्राच्या वाढत्या मागणीमुळं हिंजेवाडी, खराडी आणि नगर रोडमध्ये भाडेतत्वावरील घरांच्या किमतीसुद्धा एका वर्षाला 2 ते 4 टक्क्यांनी वाढत आहेत. तर, Anarock च्या अहवालानुसार मोठ्या घरांच्या मागणीमुळं या आयटी हबमध्ये घरांचं सरासरी क्षेत्रफळ 2023 मधील 1070 चौरस फुटांवरून 5 टक्क्यांनी वाढून 2025 मध्ये 1119 वर पोहोचलं आहे.
कोणता भाग ठरतोय हॉटस्पॉट?
पुण्यातील उपनगरीय भागांकडे असणारा अनेकांचा कल पाहता मुख्य पुण्यापासून 25 किमी अंतरावर असणाऱ्या पुनावळे या परिसराला सध्या नवं रुप मिळत आहे. ‘रेसिडेन्शिअल हॉटस्पॉट’ म्हणून हा भाग नावारुपास येत असून, अगदी प्रिमियम विकासकांसह खरेदीदारांनाही हा भाग अतिशय वेगानं आकर्षित करत आहे.
तज्ज्ञांच्या मते रोजगारांच्या मुख्य केंद्रानजीक मायक्रो मार्केटमध्ये घरांची मागणी सातत्यानं वाढत आहे. ज्याचा थेट फायदा सध्या पुनावळे परिसराला मिळत आहे. पश्चिम पुण्यामध्ये सध्या बरीच बांधकामं झाली असून, त्या तुलनेत पुनावळेमध्ये किमती अवाक्याबाहेर गेल्या नाहीयेत. इथून शहराच्या इतर भागांमधील प्रवासही सुकर आहे. तर, जीवनशैलीचा स्तर उंचावण्यासाठीची अनेक साधनं आणि सुविधा इथं आहेत. त्यामुळं येत्या काळात सानथोरांसाठी अगदी योग्य अशा प्रोजेक्टची इथं कितपत रिघ लागते हे पाहणं महत्त्वाचं असेल.
प्राधान्यस्थानी काय?
आयटी प्रोफेशनलशिवाय पिंपरी चिंचवड, निगडी आणि रावेतसारख्या भागांमधूनसुद्धा अनेक कुटुंब पुनावळेच्या दिशेनं नव्या घराच्या शोधात पोहोचत आहेत. राहिला मुद्दा इथं येऊ इच्छिणाऱ्यांच्या प्राधान्यक्रमाचा तर लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, फिटनेस सेंटर, को वर्किंग स्पेस अशा सुविधा खरेदीदारांत्या प्राधान्यस्थानी आहेत. पिंपरी चिंचवड मनपामध्ये मोडत असल्या कारणानं इथं महामार्ग विस्तारीकरणासह मेट्रो प्रकल्पांचाही थेट फायदा पोहोचत आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामुळं मुंबईपर्यंतच्या प्रवासाची वेळही कमी होत आहे, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथून फक्त दीड तासांच्या अनुमानित अंतरावर आहे. ज्यामुळं पुनावळेच ठरत आहे सध्याच्या घडीचा रिअल इस्टेटमधील हिरा!
