मध्य रेल्वेवरील कल्याण – कसारा स्थानकांदरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेच्या कामाचा भाग म्हणून खर्डी यार्डच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक असलेल्या ‘नॉन-इंटर लॉकिंग’ कामाकरिता उंबरमाळी – आटगाव स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामासाठी २५ एप्रिल रोजी दुपारपासून सुमारे १५ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान लोकल उपलब्ध नसतील.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२ पासून ते मध्यरात्री ३ पर्यंत उंबरमाळी – आटगावदरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गिकांवर ब्लॉक असेल. त्यामुळे कसाराच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आसनगाव किंवा टिटवाळा स्थानकांवर थांबवण्यात येतील. तसेच याच स्थानकातून लोकल सीएसएमटीच्या दिशेने मार्गस्थ होतील. शनिवारी दुपारी २.४२ वाजता कसारा येथून सुटणारी सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे. तर, काही लोकल अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.
सीएसएमटी येथून सकाळी ९.३४ ते रात्री ९.३२ या वेळेत सुटणाऱ्या सीएसएमटी – कसारा लोकल आसनगावपर्यंत चालवण्यात येतील. सीएसएमटी येथून दुपारी १.३० वाजता सुटणारी सीएसएमटी – आसनगाव लोकल, सायंकाळी ६.२८ वाजता सुटणारी सीएसएमटी – कसारा लोकल, तसेच शनिवारी रात्री सीएसएमटी येथून १२.०८ वाजता सुटणारी सीएसएमटी – कसारा लोकल टिटवाळा येथेच थांबवण्यात येईल. तर शनिवारी रात्री १०.४७ वाजता सीएसएमटी – कसारा लोकल वासिंद येथेच थांबवण्यात येईल.
उन्हाळ्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने विशेष गाड्यांच्या १८ हजार फे-या चालवण्याची योजना आखली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या तयारीचा आढावा घेतला. १५ जुलैपर्यंत या विशेष गाड्या चालवण्यात येणारेय.
