भारतातील पर्यटन क्षेत्रात डोकावून पाहिल्यास या देशात पाहण्याजोग्या आणि जाणून घेण्याजोग्या बऱ्याच जागा आहेत हे लक्षात येतं. चारही दिशांना या देशात अगदी गाव बदलताच खाद्यासंस्कृतीपासून चालीरिती आणि रुढीपंरपरा बदलतात. भाषेचा लहेजा बदलतो आणि समुदायसुद्धा बदलतात. आर्थिक स्तरापासून ते अगदी विकासाची विविध रुपंसुद्धा या देशात पाहायसा मिळतात, तर गावचं गावपण नेमकं कसं असावं हे दाखवणारी काही ठिकाणंसुद्धा भारभ्रमंतीमध्ये दिसतात. अशा या देशातील काही ठिकाणं ही एखाद्या रहस्याहून कमी नाहीत. प्रामुख्यानं देशातील मंदिरं, जिथं परंपरा, धारणा आणि समजुतींचा अनोखा मेळ साधला गेल्याचं दिसून येतं. असंच एक मंदिर दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये आहे. ज्याचा संबंध थेट महाभारत काळापासून असल्याचं सांगण्यात येतं.
ही देवता सामान्य नाही..
हे मंदिर किंवा तिथं असणारी देवता सामान्य नसून, तृतीयपंथीयांचं ते आराध्य आहे. हे आहे तामिळनाडूतील कुवगम इथं असणारं अरावन मंदिर, जे कूथंडावर मंदिर या नावानंही ओळखलं जातं. तृतीयमंथीयांचे देव अरावन यांना हे मंदिर समर्पित आहे. महाभारत काळातील अर्जुनाचा पूत्र अरावन यांची इथं पुजा होते. अरावननं देवतांसाठी स्वेच्छेनं बलिदान देत अमरत्वं स्वीकारलं होतं. या मंदिरात तृतीयपंथीयांसाठी एका खास उत्सवाचं आयोजनही करण्यात येतं. तामिळ महिना चिथिरईमध्ये 18 दिवस हा उत्सव चालतो, ज्यासाठी देशभरातून तृतीयपंथी इथं येतात. जिथं ते अरावन देवतेशी विवाह करता आणि दुसऱ्याच दिवशी देवतेच्या बलिदानाचा शोकाकूल आक्रोश केला जातो. चहुबाजूंना दु:खाची लाट पसरते.
पौराणिक कथा काय सांगते?
तामिळनाडूतील या मंदिराचा थेट संबंध महाभारत काळाशी जोडला जातो. अशी धारणा आहे की, कालीमातेची पांडवांवर कृपा व्हावी यासाठी नरबळीची आवश्यकता होती. मात्र, बलिदानासाठी कोणीही तयार नव्हतं. मात्र अधर्मावर धर्माचा विजय व्हावा यासाठी स्वेच्छेनं बलिदान देण्यासाठी सज्ज झाला तो म्हणजे अर्जुनाचा पुत्र अरावन. मात्र त्यासाठी त्यानं एक अट ठेवली, की ते अविवाहित असतानाच मृत्यू स्वीकारु इच्छित नव्हते. बलिदानाच्या निर्णयामुळं कोणतीच मुलगी त्याच्याशी लग्न करण्यासाठी तयार नव्हती.
