राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाडला असून सूर्य आग ओकत असल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झालेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघात, डिहायड्रेशन आणि पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढले असून रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या वाढल्याचं चित्र दिसत आहे. सध्या दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात (Heat Stroke), उलट्या-जुलाब, चक्कर येणे, तसेच किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. उन्हाचा हा प्रकोप आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. लहान मुलांवरही याचा मोठा परिणाम होत असल्याने आता शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शाळांच्या वेळा बदलल्या
अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून सर्व शाळा, अंगणवाडी व नर्सरी सकाळी 7 ते 10 पर्यंतच सुरू ठेव्याचे आदेश देण्यात आले आहे. हा आदेश 21 एप्रिल ते 30 एप्रिल २०२६ दरम्यान लागू असणार आहे. सकाळी 10 नंतरचे तास ऑनलाईन/डिजिटल माध्यमातून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाईचा करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
11 च्या आत खासगी क्लासही संपवण्याचे आदेश
दुसरीकडे अकोल्यामध्येही वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अकोल्यामध्येही खाजगी शिकवणी वर्ग, शाळा आणि महाविद्यालयांना सकाळी 11 वाजताच्या आतच वर्ग संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना होणारा त्रास लक्षात घेता अकोला महापालिकेने विविध ठिकाणी उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील प्रमुख भागांत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होते त्या ठिकाणी पाणी आणि सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उष्माघाताचा धोका लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयात 14 बेडचा विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. तसेच, याशिवाय, कचरा संकलनासाठी फिरणाऱ्या घंटागाड्यांमधून ध्वनीफितीद्वारे नागरिकांना उन्हापासून बचावाचे मार्गदर्शन केले जात आहे. शहरातील सिग्नल व्यवस्था दुपारी 12 ते 5 या वेळेत बंद ठेवण्याची विनंती महापालिकेने पोलिस विभागाला केली आहे.
या राज्यांमध्येही बदलल्या शाळांच्या वेळा
शाळांच्या वेळांमधील हा बदल केवळ महाराष्ट्राच नाही तर उत्तर प्रदेशबरोबरच मध्य प्रदेश, केरळ आणि इतरही राज्यांमध्ये करण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेचा फटका ज्या ज्या भागांना बसला आहे तिथे हा बदल करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे 11 वाजण्याच्या आधी मुलं घरी पोहचतील अशा वेळांमध्येच शाळांचे वर्ग भरवले जात आहेत.
