काही खास निमित्त किंवा अनेकांसाठी गरजा… कैक कारणांनी हल्ली सर्रास हॉटेलं आणि रेस्तराँमध्ये खाणपिणं होतं. कारणं अनेक असतात मात्र, बाहेरचं खाण्याची हौस मात्र अनेकांनाच असते. मात्र याच हॉटेलांमध्ये काही प्रसंग असेही येतात जेव्हा जेवणाचा दर्जा काहीसा ढासळल्याचं ग्राहकच निदर्शनास आणून देतात. निकृष्ट दर्जाचं साहित्य, भेसळयुक्त साहित्याच्या वापरामुळं हॉटेलमध्ये खाणं अनेकदा ग्राहकांना महागातही पडलं. मात्र यावर आता थेट राज्य शासनानंच उपाय शोधला आहे, तो म्हणजे एका नव्या नियमाच्या माध्यमातून. या नियमामुळं आता हॉटेलांच्या मेन्यूकार्डमध्ये बदल पाहता येणार आहेत.
हॉटेलचं मेन्यूकार्ड व्यवस्थित वाचून घ्या
चीज ॲनालॉग वापराबाबत अन्न व औषध प्रशासनानं हॉटेल मालकांना इशारा दिला आहे. रेस्तराँ, हॉटेलांमध्ये अनेकदा ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी गेल्या काही काळापासून वाढल्या आहेत. मुळात पनीर फक्त दुधापासून तर चीज अॅनालॉग वेगळ्या घटकांपासून तयार करण्यात येतं ही बाब लक्षात घेण्याजोगी. ज्यामुळं इथून पुढं रेस्तराँ आणि हॉटेलांना बिलासह, मेन्यूकार्डवर “चीज/पनीर ॲनालॉग” स्पष्ट नमूद करणं बंधनकारक असेल. औषध प्रशासनानं ही बाब स्पष्ट केली आहे.
लेबलिंगसह माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारासुद्धा शासनाकडून देण्यात आला आहे. उत्पादक आणि पुरवठादारांनीही योग्य लेबलिंग करणं आवश्यक असल्याचं या आदेशात बजावण्यात आलं आहे. तर ग्राहकांना खरेदीवेळी “ॲनालॉग” तपासण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्याबाबत तक्रार करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे
सरकारच्या परिपत्रकानुसार चीज/पनीर ॲनालॉग असे वेगवेगळे स्पष्ट करण्याच्या सूचना आहेत. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधीमंडळ अधिवेशनात मुद्दा मांडला होता. ज्यानंतर मंत्री नरहरी झिरवळांनी कारवाईचे आदेश दिले होते. परिणामी आता अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भातील नवे नियमच जारी केले आहेत.
लक्षात घ्या, अन्न सुरक्षा आणि मानक (अन्नपदार्थ मानक व अन्न मिश्रित पदार्थ) विनियम, 2011 मधील विनियम 2.1.1 नुसार पनीर फक्त दुधापासूनच तयार होणारा पदार्थ आहे. तर, किंवा डेअरी अॅनालॉग दुधाव्यतिरिक्त, खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर काही घटकांच्या वापरातून तयार केला जातो. तो पनीरसारखा दिसत असला तरीही पनीर मात्र नसतो. ज्यामुळं तो चीज अॅनालॉग म्हणून गणला जातो.
