बीडमधील महिला घरातून बेपत्ता; दोन दिवसांनी तलावात बॉडी आढळली, घटनेनं कुटुंबाला धक्का

शहरातील धोंडीपुरा भागातील थिंगळे गल्ली येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेचा दोन दिवसांनंतर दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. शशिकला अशोक जाधव असे या मृत महिलेचे नाव असून, त्यांचा मृतदेह सोमवारी दुपारी घोडका राजुरी तलावात तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण बीड शहरात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शशिकला जाधव या गेल्या दोन दिवसांपासून आपल्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्या थिंगळे गल्ली येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होत्या. घरातून बाहेर पडल्यानंतर बराच वेळ झाला तरी त्या घरी परतल्या नाहीत, तसंच त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे त्यांचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत होते. नातेवाईक, मित्रमंडळी आणि स्थानिक नागरिकांनी बीड शहराच्या विविध भागात तसंच संभाव्य ठिकाणी त्यांचा कसून शोध घेतला, परंतु त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर या प्रकरणी पोलिसातही माहिती देण्यात आली होती.

तलावात आढळला मृतदेह
सोमवारी दुपारच्या सुमारास घोडका राजुरी तलावाच्या परिसरात काही ग्रामस्थांना पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो मृतदेह बेपत्ता असलेल्या शशिकला जाधव यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

परिसरात शोककळा
शशिकला जाधव या अत्यंत मनमिळावू, शांत आणि प्रेमळ स्वभावाच्या महिला होत्या. आपल्या परिसरात त्या सर्वांशी मिळूनमिसळून वागत असत, त्यामुळे त्या सर्वांना परिचित होत्या. त्यांच्या अशा अचानक जाण्याने धोंडीपुरा आणि थिंगळे गल्ली परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. शशिकला जाधव तलावापर्यंत कशा पोहोचल्या? ही आत्महत्या आहे की घातपात? बेपत्ता होण्यामागे काही कौटुंबिक किंवा मानसिक कारण होते का? असे प्रश्न उपस्थित होत असून सध्या तरी या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *