महिलेच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण; आधी वाघाने हल्ला केल्याची चर्चा, पण आता वेगळाच संशय, घटनास्थळी काय-काय आढळलं?

मोहफुले गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र सदर महिलेच्या मृत्यू प्रकरणात आता संशयाचे सावट निर्माण झालं आहे. सुरुवातीला तिचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाला असावा असे मानले जात होते, परंतु घटनास्थळावरील परिस्थिती आणि शवविच्छेदन अहवालाने गंभीर प्रश्न निर्माण केले असून, या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं आहे. वाघाच्या हल्ल्याचा बनाव रचून त्या महिलेची पूर्वनियोजितपणे हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

ही घटना उघडकीस येताच धानेगाव आणि आसपासच्या परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, 17 एप्रिल रोजी तुमसर तालुक्यातील धानेगाव मधील तुमसर वनक्षेत्रात साधना सीताराम उइके नावाची ५२ वर्षीय महिला मृत अवस्थेत आढळली होती. महिलेचा मृतदेह जंगलात आढळून आला. प्राथमिक तपासात हा वन्य प्राण्याचा हल्ला असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु आता अनेक विसंगती समोर आल्या असून यातून हत्येचा संशय बळावला आहे.वन विभागाने सुरुवातीला वन्य प्राण्याच्या हल्ल्याची शक्यता नाकारली होती.

तज्ञांच्या मते, जर हा वाघ किंवा बिबट्याचा हल्ला असता, तर मृताच्या मानेच्या दोन्ही बाजूंना खोल जखमा आढळून आल्या असत्या. परंतु, या प्रकरणात महिलेच्या मानेच्या फक्त एकाच बाजूला सुमारे २ इंच लांबीची एक धारदार जखम आढळून आली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रक्ताचे डाग असलेल्या ठिकाणापासून सुमारे २.८ किलोमीटर अंतरावर महिलेचा मृतदेह सापडला आहे. वन्य प्राणी सहसा आपली शिकार ओढत नेतात, परंतु घटनास्थळावरील जमीन नेहमीपेक्षा खूपच सपाट होती, ज्यामुळे मृतदेह पोत्यात घालून आणला असावा असा संशय निर्माण होत आहे. शिवाय, मृतदेह १५ फूट खोल खड्ड्यात सापडला, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात.

दरम्यान, मृतदेहाच्या खांद्यापासून कमरेपर्यंत खरचटल्याच्या खुणा आढळल्या, परंतु पायांवर किंवा टाचांवर कोणतीही जखम नव्हती, ज्यामुळे ही संपूर्ण घटना अधिकच संशयास्पद झाली असून हा मृत्यू वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे झाला की पूर्वनियोजित हत्या होती, याबाबतचा तपास पोलीस प्रशासन आणि वनविभागाकडून केली जात असून या तपासातून नेमकं काय निष्पण्ण होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *