कौटुंबिक वादाला कंटाळली, विवाहितेनं पोटच्या दोन चिमुकल्यांसह आयुष्य संपवलं; एकाचवेळी मायलेकांवर अंत्यसंस्कार

लातूर जिल्ह्यात एका महिलेनं दोन चिमूरड्यासह आत्महत्या केल्याची मोठी घटना उघड झाली आहे. औसा तालुक्यातील खरोसा गावात रविवारी १९ एप्रिल रोजी रात्री कौटुंबिक वादातून एका कंटाळलेल्या आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. निकिता अमरदीप भुरे (वय २५) या विवाहितेनं आपल्या दोन मुलांसोबत घेत ग्रामपंचायतीजवळील विहिरीत उडी घेतली. यात तिघांचाही मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

नेमकी घटना काय?

प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हा या टोकाच्या निर्णयामागील कारण असल्याचं समोर येत आहे. मात्र, नेमकं कारण काय होतं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नातेवाईक, शेजारी आणि संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून तिन्ही पार्थिव बाहेर काढले. मनोज भरत भुरे यांच्या फिर्यादीवरून किल्लारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर पार्थिव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा तिघा मायलेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

लातूरमध्ये अल्पवयीन लेकरांसोबत काय घडलं?

रविवारी १९ एप्रिल रोजी सकाळी लातूरमधील चाकूर शहरातील स्वामी परिवारातील दोन सख्खे चुलत भाऊ घराबाहेर खेळण्यासाठी गेले परंतू ते परत न आल्यानं घरच्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, ते परतलेच नाही यामुळे कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्वामी कुटुंबातील दोन चुलत भाऊ आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाले. यापैकी एकाचे वय ६ वर्ष तर दुसऱ्याचं वय ११ वर्ष आहे.

खेळायला गेलेली मुले परतलीच नाही

सकाळपासून दोन्ही मुलांचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. कुटुंबीयांनी तातडीने चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गावात आणि परिसरात शोधमोहीम सुरू असतानाच काही तासांनी धक्कादायक घटना उघडकीस आली. ६ वर्षीय देवांश मंगेश स्वामी हा घरापासून अवघ्या सुमारे ६० फुटांवर मृताअवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *