मुंबईच्या वेशीवर नव्या शहरासाठी 124 गावातील जमिनी जाणार;

मुंबईला जागतिक दर्जाचं शहर करण्यासाठीच्या कार्यामध्येच शहरालगतच्या भागांचाही सर्वांगीण विकास शासनानं हाती घेतला आहे. नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये याच विकासाच्या खुणा दिसत असून येत्या काही वर्षांत मुंबईच्या कक्षा रुंदावण्यासोबतच जागतिक दर्जाची उपशहरं, किंबहुना तिसरी मुंबईसुद्धा संपूर्ण जगाचं लक्ष वेधणार यात शंका नाही. सध्या याच तिसऱ्या मुंबईच्या अनुषंगानं मुंबईच्या वेशीवरच अनेक पायाभूत सुविधांचा विकास हाती घेण्यात आला आहे. यातीलच महत्त्वाचा टप्पा म्हणजे तिसऱ्या मुंबईसाठीचं भू- संपादन. ही प्रक्रिया आता सुरू होत असून, (MMRDA) एमएमआरडीएकडून ऑनलाइन पद्धतीने जमीन मालकांची संमती घेतली जाणार असून, 27 एप्रिलपासून या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होत आहे.

कुठं साकारली जात आहे तिसरी मुंबई? 

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठा सागरी सेतू अशी ओळख असणाऱ्या अटल सेतू प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रात ही तिसरी मुंबई उभी राहणात आहे. या डोळे दीपवणाऱ्या शहरासाठी भूसंपादनाची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएनं सुरू केली आहे. या प्रक्रियेनुसार भूसंपादनासाठी जमीन मालकांची प्रत्यक्ष संमती घेण्याची प्रक्रिया 27 एप्रिलपासून सुरू होईल अशी माहिती आहे. या प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

124 गावांमधील जमिनी जाणार…

अटल सेतूच्या नवी मुंबईकडील प्रभाव क्षेत्रात रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील तब्बल 124 गावांचा समावेश असून त्यातील साधारण 323.44 चौ. किमी भूखंड या तिसऱ्या मुंबईसाठी वापरात येणार आहे. 16 मार्चरोजीच यासाठी राज्य सरकारने भूसंपादन- भूवाटप धोरण जाहीर केलं होचंय

सदर धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांना सिडको आणि एमआयडीसीच्या तरतुदींअंतर्गत 22.5% विकसित भूखंडाचा परतावा देण्यात येईल. हा परतावा/ मोबदला रोख भरपाई किंवा एफएसआय/टीडीआर स्वरूपात देण्यात येईल.

कुणाला किती भूखंड वाटप ?

उरण, पनवेल तालुक्यातील जमीन मालकांना 22.5 टक्के विकसित भूखंडाचं वाटप उरण तालुक्यात करण्यात येईल. तर पेण तालुक्यातील जमीन मालकांना 22.5 टक्के विकसित भूखंड त्याच तालुक्यात देण्यात येणार आहे.

ऑनलाईन प्रक्रियेमुळे भू-संपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा मानस असून, जमीन मालकांना आवश्यक कागदपत्रांसह ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या नव्या प्रक्रियेमुळे भू-संपादन प्रक्रियेला वेग मिळणार असून, त्यामुळं प्रक्रियेतील विलंब कमी होऊन वादही कमी होतील अशी अपेक्षा यंत्रणेनं ठेवत नियोजित पद्धतीने नवीन शहर उभारणी शक्य होईल, असा दावा एमएमआरडीएनं केला.

कशी असेल तिसरी मुंबई? 

तिसरी मुंबई उभारत असताना प्रामुख्यानं लोककेंद्रित विकासाला प्राधान्य दिलं जाईल. मुळात शहर निर्मिती नागरिकांच्या सहभागातूनच व्हावी, या विश्वासातून जमीनमालकांना सध्या विविध पर्याय दिले जात असून या शहराच्या निर्मितीचं यश त्यांच्यावर अवबंलून असल्याची बाब MMRDA चे महानगरआयुक्त संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केली.

अटल सेतू, नवी मुंबई विमानतळ, मेट्रोची जोडणी आणि मुंबई पुण्याच्या जोडणाऱ्या एस्क्प्रेवेची जोडणी अशा अनेक मार्गांनी ही तिसरी मुंबई जोडली जाणार असल्यामुळं येत्या काळात हे शहर नेमकं कसं दिसेल हे पाहणंसुद्धा एक परवणीच असेल. नाही का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *