नाशिकमधील धर्मांतर प्रकरणी कंपनीतील संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी कशाप्रकारे या प्रकरणाचा भांडाफोड केला याची माहिती दिली आहे. कंपनीत लैंगिक अत्याचार सुरु असल्याची तक्रार मिळाल्यानंतर सहा महिला पोलीस अधिकारी अंडरकव्हर म्हणून गेल्या होत्या. या अधिकारी आरोपी कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर पाळत ठेवण्यासाठी 40 दिवस बीपीओमध्ये काम करत होत्या.
अनेक कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन होत असल्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारेच ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ही मोहीम शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या देखरेखीखाली राबवण्यात आली.
प्रकरण समोर कसं आलं?
26 मार्चला सर्वात आधी हे प्रकरण समोर आलं. एका महिला कर्मचाऱ्याने देवळाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची तक्रार तिने केली होती. तपासादरम्यान, आणखी काही तक्रारी समोर आल्या. एका पुरुष कर्मचाऱ्यासह आणखी आठ कर्मचाऱ्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन, लैंगिक छळाचे आरोप केले. एकूणच, 26 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत आठ एफआयआर दाखल करण्यात आले.
कोणते गुन्हे दाखल करण्यात आले?
आरोपींवर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये बलात्कार, लैंगिक छळ, पाठलाग करणं, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावणं यासारख्या आरोपांचा समावेश आहे.
आठ आरोपींपैकी सात जणांना 7 एप्रिल रोजी अटक करण्यात आली. अटकेनंतर कंपनीने त्यांना कामावरुन काढून टाकलं. आठवा आरोपी एचआर आहे. पीडितांपैकी एकाने ई-मेलच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतरही कारवाई न केल्याचा एचआरवर आरोप आहे.
अंडरकव्हर टीमने नेमकं काय केलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिला अधिकाऱ्यांनी कंपनीत रुजू झाल्यानंतर आरोपींवर लक्ष ठेवलं होतं. मीटिंग आणि कामाच्या ठिकाणी त्याच्या वागणुकीवर त्या बारकाईने लक्ष ठेवून होत्या. यादर्यान त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात होत्या. कामावरुन सुटल्यानंतर संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांना दिली जात आहेत.
विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख संदीप मितके यांनी, अत्यंत सुनियोजितपणे हे सर्व करण्यात आल्याचं सांगितलं आहे. यामुळे सुरुवातीला मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यास मदत झाली असं ते म्हणाले आहेत. अंडरकव्हर महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे, आरोपांमधील तथ्याची पुष्टी करण्यात मदत झाली.
बँक खात्यांची एसआयटीकडून चौकशी
नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी कंपनीतील संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडून चौकशी केली जात आहे. 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचे जाळे विणल्याचा संशय आहे. महिला अत्याचार व धर्मांतर प्रयत्न प्रकरणी पोलिसांनी कठोरपणे तपास सुरु केला आहे. संशयितांना देशाबाहेरील व्यक्ती, संघटनांकडून फंडिंग होते का? याचा एसआयटी कडून तपास सुरू आहे.
कंपनीमधील माजी कर्मचाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे. विशिष्ट समुदायावर लक्ष असल्याचा आरोप त्याने केला आहे. आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी संशयित काम संपल्यावर घरी न जाता कंपनीत विशिष्ट हालचाली करायचे असा खुलासा त्याने केला आहे. काही महिलांना मानसिक दबावाखाली ठेवून हालचाली केल्याचा संशय आहे.
ई-मेल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड, धमक्या यांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. कंपनीने चौकशीसाठी आरती सुब्रह्मण्यम यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमली आहे. कंपनीने नाशिकमधील प्रकरण वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
