ईको कारला सिमेंट मिक्सर ट्रकची धडक, एका क्षणात 11 जणांचा करुण अंत, कल्याण अहिल्यानगर महामार्गावर दुर्दैवी घटना

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. कल्याणहून मुरबाडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका ईको कारला सिमेंट मिक्सर ट्रकने समोरून भीषण धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर ईको कारचा अक्षरशः पत्र्यासारखा चक्काचूर झाला आहे. या हृदयद्रावक घटनेत 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, ही संख्या वाढणाच्याही भीती व्यक्त केली जाते आहे. या अपघताने महामार्गवरची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. अपघातातील गंभीर जखमींची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

कसा घडला अपघात?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कल्याण ते मुरबाड दरम्यान वाहतूक करणारी ईको कार आपल्या मार्गावर असताना, एका पुलावर समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकची तिला जोरदार धडक बसली. या धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कारचा चक्काचूर झाल्याने कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. कारमधील सर्व मृत झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृतांना बाहेर काढले

ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची पुलावर समोरासमोर धडक झाल्याचे कळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी कटरच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढले. जखमी प्रवाशांना जवळच्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

वाहतूक विस्कळीत

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटवण्याचे काम यावेळी सुरू आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले असून, या भीषण अपघातामुळे मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस आता या अपघाताचा नेमका दोष कोणाचा होता, याचा तपास करत आहेत. परंतू अशा अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? अशा घटना कशा थांबवता येतील हे आणि असे अनेक प्रश्न या अपघातामुळे समोर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *