केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाने आता आपल्या शिफारशी तयार करण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. हा आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, पेन्शन, भत्ते, रजा, सेवा अटी यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहे. सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 68 लाखांहून अधिक पेंशनधारकांच्या आयुष्यात हा आयोग मोठा बदल घडणार आहे. आयोगाने कर्मचारी संघटना, युनियन्स आणि सरकारी संस्थांकडून सूचना मागितल्या असून या सूचना अंतिम शिफारशींमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या अडचणी थेट सांगण्याची संधी मिळणार आहे. काय घडतंय नेमकं? सविंस्तर जाणून घ्या.
दिल्लीत 3 दिवस महत्त्वाच्या बैठका
दिल्लीत 28,29 आणि 30 एप्रिल या तारखांना तीन दिवस बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठका मुख्यतः केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेचा आढावा घेण्यासाठी आहेत. विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी येथे आपल्या मागण्या आणि अडचणी मांडणार आहेत. दिल्ली ही राजधानी असल्याने इथे देशभरातील अनेक मोठ्या संघटनां सहभागी होण्याची शक्यता आहे. बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांवर आयोग गंभीरपणे विचार करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात आता धाकधूक वाढू लागलीय.
पुण्यात 2 दिवस बैठकांचा कार्यक्रम
पुण्यात 4 आणि 5 मे या दोन दिवसांत आयोगाचे प्रतिनिधिमंडळ भेट देणार आहे. इथे केंद्रीय सरकारी कार्यालये आणि स्थानिक युनियन्सचे प्रतिनिधी आपल्या सूचना देणार आहेत. पुणे हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याने पश्चिम भारतातील कर्मचाऱ्यांच्या समस्या इथे मांडल्या जातील. या दोन्ही शहरांतील बैठका ही पहिली टप्प्यातील आहेत. नंतर मुंबईसह इतर शहरांमध्येही अशाच बैठका होणार आहेत.
चर्चेचे मुख्य विषय काय?
बैठकांमध्ये वेतन वाढ, पेन्शन सुधारणा, घरभाडे, महागाई असे विविध भत्ते, रजा धोरण आणि सेवा शर्ती यावर सविस्तर चर्चा होणार आहे. कर्मचाऱ्यांना नवीन वेतनश्रेणी, पेन्शन फॉर्म्युला आणि भत्त्यांमध्ये बदल हवे आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित सूचना घेतल्या जातील. यामुळे शिफारशी अधिक व्यावहारिक आणि फायदेशीर होतील.
कर्मचारी-पेंशनधारकांवर काय परिणाम?
या बैठकांमुळे 50 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेंशनधारकांच्या भविष्यातील आर्थिक स्थिती ठरेल. वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ झाली तर महागाईचा भार कमी होईल. भत्ते आणि रजा नियम सुधारल्यास कामाच्या ठिकाणी समाधान वाढेल. आयोगाच्या या चरणात कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकल्या गेल्या तर अंतिम अहवाल अधिक न्याय्य होईल. यामुळे सरकारी नोकरी आकर्षक राहील आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली पेन्शन मिळणार आहे.
बैठकीत भाग कसा घ्यायचा?
इच्छुक संघटना आणि युनियन्सना प्रथम 8cpc.gov.in या आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर मेमोरंडम ऑनलाइन सादर करावे लागेल. तेथून मिळणारा ‘युनिक मेमो आयडी’ वापरून 20 एप्रिलपर्यंत अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. दिल्लीसाठी abhay.sahay@nic.in आणि पुण्यासाठी jha.anandkumar@nic.in या ईमेलवर संपर्क साधता येईल. प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी ठेवण्यात आलीय. ज्यामुळे प्रत्येकाची आवाज पोहोचणार आहे.
पुढील योजना काय?
“आयोगाची कामे आता वेगाने सुरू झाली आहेत. आम्ही पेन्शन आणि इतर मुद्द्यांवर आपल्या सूचना देणार आहोत”, असे ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मंजीत सिंह पटेल यांनी सांगितले. त्यांनी कर्मचाऱ्यांना बैठकीसाठी तयार राहण्याचे आवाहन केलंय. दिल्ली-पुणे बैठका ही सुरुवात आहे. लवकरच देशातील इतर राज्यांमध्येही अशाच चर्चा होतील. यामुळे सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समस्या समोर येतील आणि शिफारशी अधिक संतुलित होतील, असे आयोगाने सांगितले आहे.
