महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट होतं. गारपीट आणि सोसाट्याचा वाऱ्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पण आता हवामान विभागाने जाहीर केलं की महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे ढग नाहीसे झाले आहेत. पण राज्यावर आता दुसरं संकट घोंघावतंय. महाराष्ट्रात आता उष्णतेची लाट येणार आहे. कोकणात पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह सहा जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचं संकट घोंघावत आहे, असं हवामान विभागाने जाहीर केलं आहे. आज कोकणातील हवामान मुख्यत: कोरडे आणि आकाश निरभ्र राहणार आहे. तर मुंबईचा पारा 36 अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतात कसं असेल वातावरण?
महाराष्ट्रानंतर भारतात इतर ठिकाणी हवामान कसं असेल पाहूयात. हवामान विभागानुसार पूर्व आणि ईशान्य भारतात तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान असणार आहे. तर भारतीय हवामान विभागाच्या मते, 11 आणि 12 एप्रिल रोजी देशाच्या बहुतांश भागांमध्ये कोणत्याही मोठ्या हवामान बदल नसणार आहे, असं सांगण्यात आलंय.
