आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.
दरम्यान, दानिश वगळता इतर पाच जणांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यामुळे शुक्रवारी (दि. १०) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यासह मुंबई नाका पोलिसांत दाखल एका गुन्ह्यात संशयित ‘एचआर’ अश्विनी अशोक चैनानी (वय ५१, रा. प्रकाश अपार्टमेंट, लुलानगर, पुणे) हिलासुद्धा अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांच्या न्यायकक्षात युक्तिवाद झाला. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे सहाय्यक संचालक किरण बेंडभर आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिकेत आव्हाड यांनी युक्तिवाद केला. तर, संशयितांच्या बाजूने वकील राहुल कासलीवाल, बाबा सिद्दीकी, हानिद शेख यांनी युक्तिवाद केला.
यापूर्वी पोलिसांनी संशयितांना दोन वेळा पोलिस कोठडी मागितली असून, आतापर्यंत सबळ पुरावे सादर झालेले नाहीत. यासह संशयित तपासात सहकार्य करीत नाहीत, हा वाढीव पोलिस कोठडीसाठी मुद्दा योग्य नसल्याचा युक्तिवाद झाला. न्यायालयाने त्यानुसार पाचही पुरुष संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पाचही संशयितांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद होताच कंपनीतील संशयित ‘एचआर’ अश्विनी चैनानी हिला ताब्यात घेण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या ‘एसआयटी’चे एक पथक पुण्यात ठाण मांडून होते. तिला गुरुवारी (दि. ९) दुपारी कंपनीच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी नोटीस देऊन सोडल्यानंतर शुक्रवारी (दि. १०) पुन्हा अटक करण्यात आली. त्यामुळे कंपनीतील इतर अधिकारी -कर्मचारीही आता अडचणीत सापडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंभीर दखल घेतली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, देवळाली कॅम्पचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, मुंबई नाक्याचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांसह बारा जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) याबाबत तपास करीत आहे.
एचआर संशयित, अधिकारी रडारवर
संबंधित गुन्ह्यातील सर्व पीडिता पदवीधर व उच्चपदवीधर असून, १८ ते २२ हजार रुपयांपर्यंत त्यांना वेतन आहे. त्यांपैकी काही पीडितांनी कंपनी व्यवस्थापनाने पीडितांच्या लेखी व तोंडी तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते. हे दुर्लक्ष केल्यामुळे संशयितांचे धारिष्ट्य वाढले आणि हा प्रकार पुढे सुरू राहिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार एका गुन्ह्यात ‘एचआर’ संशयित असून, तिच्यामुळे व्यवस्थापनातील इतरही अधिकारी रडारवर आले आहेत. गंभीर बाब म्हणजे, संबंधित कंपनीची देशभरात कार्यालये असून, ‘मोठ्या पॅकेज’साठीही कंपनी चर्चेत आहे. मात्र, तेथील तरुणींना होणाऱ्या त्रासाची दखल का घेतली नाही, या मुद्द्यावरून आता व्यवस्थापकीय अधिकारी कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.
