मुंबईची लाइफलाईन असलेल्या लोकलनंतर आता मुंबईकरांची पसंती ‘मेट्रो 3’ (आरे ते कफ परेड) मार्गिकेला मिळत आहे. जर तुम्हीही या मेट्रोने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या खिशाचा विचार करून प्रवास सवलतींचे नवे दरवाजे उघडले आहेत. यामुळे आता मुंबईकरांचे पैसे तर वाचणारच आहेत, पण प्रवासही अधिक सुखकर होणार आहे.
विद्यार्थ्यांना डिस्काउंट!
शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी मेट्रोने मोठा निर्णय घेतला आहे. आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासावर तब्बल 25 टक्के सवलत मिळणार आहे. तुम्ही 45 फेऱ्यांचा पास घ्या किंवा 60 फेऱ्यांचा मासिक पास, दोन्हीवर ही सवलत लागू असेल. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांवरील आर्थिक ओझे मोठ्या प्रमाणावर हलके होणार आहे.
पर्यटकांसाठी ‘अनलिमिटेड’
मुंबई शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. या पर्यटकांना दक्षिण मुंबईचे सौंदर्य न्याहाळता यावे, यासाठी मेट्रोने ‘वन डे’ आणि ‘थ्री डे’ पासची सुविधा आणली आहे. यामध्ये एक दिवसाचा पास तुम्हाला केवळ 280 रुपये देऊन मिळणार आहे. यामध्ये तुम्ही दिवसभर कितीही वेळा मेट्रोने प्रवास करू शकता. याशिवाय तीन दिवसांचा पास 700 रुपयांमध्ये सलग तीन दिवस तुम्हाला हवा तितका प्रवास करण्याची मुभा देईल.
सामान्य प्रवाशांचीही बचत
केवळ विद्यार्थी किंवा पर्यटकच नाही, तर दररोज ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांसाठीही मेट्रोने सवलती जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही 45 फेऱ्यांचा पास काढला तर 10 टक्के आणि 60 फेऱ्यांच्या पासवर 15 टक्के सूट मिळेल. विशेष म्हणजे, दिव्यांग प्रवाशांना सुरुवातीपासूनच २५ टक्के सवलत दिली जात आहे, ती कायम असणार आहे.
फायदा कसा मिळवायचा?
हे सर्व फायदे मिळवण्यासाठी प्रवाशांनी ‘मेट्रो कनेक्ट 3’ (Metro Connect 3) हे अधिकृत अॅप डाऊनलोड करणे किंवा एनसीएमसी (NCMC) कार्ड वापरणे आवश्यक आहे. आरे ते कफ परेड हे 33.5 किमीचे अंतर आता कमी खर्चात आणि वेगवान पद्धतीने पार करणे मुंबईकरांना शक्य झाले आहे.
