पहिल्या नवऱ्याने जीव दिला, पूजा गावंडेने पुन्हा लग्न केलं, दुसऱ्या नवऱ्याने जीव घेतला, दीड महिन्यापूर्वी काय घडलं?

करमाड (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेची, तिच्या पतीने चाकूने वार करून, गळा चिरून हत्या केली. ही घटना गुरुवारी करमाड शिवारातील पेट्रोल पंपावर दुपारी साडेबाराला घडली. पूजा गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, हल्ली मुक्काम करमाड) असे मृत महिलेचे नाव आहे. सत्यम रावसाहेब गावंडे (२८, रा. चित्तेपिंपळगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

चाकूने वार, गळा चिरला

करमाड ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा गावंडे दीड महिन्यापासून या पेट्रोल पंपावर नोकरी करत होत्या. गुरुवारी दुपारी १२.३० वाजता सत्यम गावंडे तेथे आला. त्याने पूजावर चाकूने वार केले; तसेच गळा चिरला. त्याला काही जणांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने चाकूचा धाक दाखविला. ही सर्व घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पोलिसांनी गंभीर पूजाला रुग्णवाहिकेद्वारे घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

पहिल्या पतीने जीव दिलेला

पूजाचा पहिला विवाह चित्तेपिंपळगाव येथील सुदाम परसराम गावंडे यांच्यासोबत २०१७ मध्ये झाला. काही घरगुती कारणामुळे सुदाम यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने १५ नोहेंबर २०२५ रोजी सत्यम रावसाहेब गावंडेशी विवाह केला. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी आहे. लग्न झाल्यानंतर पूजा ही काही दिवस कुंभेफळ येथे राहत होती. परंतु दीड महिन्यापूर्वी तिचे पतीशी वाद झाल्याने ती काही दिवसापूर्वी करमाड येथे राहण्यासाठी आली होती.

पोलिसांचा फौजफाटा

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी पूजा नागरे, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे, भारत निकाळजे, जमादार विजयसिंह जारवाल, प्रशांत नांदवे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली.

आरोपी सत्यम पिंप्रीराजामार्गे कचनेरकडे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिस दादासाहेब ढवळे व सोपान डकले यांनी फिल्मी स्टाइलने आरोपीचा पाठलाग करीत त्याला कचनेर शिवारातून एका शेतातून अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *