कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंगमध्ये एमएसच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणारी ३५ वर्षीय विद्यार्थिनी नीलम शिंदे हिला वर्षभरापूर्वी भीषण अपघात झाला होता. नीलमच्या गाडीला फेब्रुवारी २०२५ मध्ये एका भरधाव वाहनाने धडक दिली होती. तेव्हापासून ती कोमात होती. अखेर २८ मार्च २०२६ रोजी नीलमची मृत्यूशी झुंज संपल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली.
अमेरिकेत अंत्यसंस्कार
मंगळवारी कॅलिफोर्निया येथील ‘माउंट व्हर्नन मेमोरियल पार्क’मध्ये तिचे मोजके नातेवाईक आणि मित्रांनी हिंदू रितीरिवाजांनुसार तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. सातारा जिल्ह्यातील कराडजवळ असलेल्या उमरज येथे वास्तव्यास असलेल्या तिच्या वडिलांची परवानगी घेतल्यानंतर तिची त्वचा आणि नेत्रपटल (कॉर्निया) दानासाठी काढून घेण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
कधी झाला होता अपघात?
हा अपघात १४ फेब्रुवारी २०२५ च्या संध्याकाळी घडला होता. नीलमच्या आईच्या पहिल्या पुण्यतिथीनंतर जेमतेम दोन दिवसांनीच. ती नेहमीप्रमाणे संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडली असताना एका भरधाव कारने तिला उडवलं होतं.
अपघातानंतर नीलम कोमामध्ये होती. तेव्हा तिचे ६९ वर्षीय वडील तानाजी शिंदे यांना व्हिसा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे नीलमच्या वडिलांना व्हिसा मिळाला आणि ते नीलमच्या चुलत भावासोबत अमेरिकेसाठी रवाना झाले. नीलमला सॅक्रामेंटो येथील ‘यूसी डेव्हिस मेडिकल सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले होते.
तानाजी यांचा दोन महिन्यांचा व्हिसा संपल्यानंतर ते भारतात परत आले. नीलमची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी कॅलिफोर्नियापासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आपल्या एका नातेवाईकाकडे सोपवली. तो नातेवाईक दर वीकेंडला तिला पाहायला जात असे.
अवयवदान करण्याचा निर्णय
२८ मार्च रोजी रुग्णालय प्रशासनाने नीलमचे निधन झाल्याचे कळवले. युद्धजन्य परिस्थिती आणि प्रकृतीच्या समस्यांमुळे तिचे वडील तिच्या अंत्यदर्शनाला अमेरिकेला जाऊ शकले नाहीत. “रुग्णालयाने आम्हाला अवयवदानाबाबत माहिती दिली. नीलमच्या वडिलांनी कुठलाही विचार न करता त्याला संमती दिली आणि तिची त्वचा व कॉर्निया काढून घेण्यात आले. त्यानंतर स्थानिक वेळेनुसार मंगळवारी दुपारी १ वाजता अंत्यसंस्काराचे नियोजन करण्यात आले” असे नीलमचे मामा संजय कदम यांनी सांगितलं.
पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमधून नीलमने कॉम्प्युटर सायन्समधून बीईचे शिक्षण घेतले होते. ‘नासा’मध्ये एक वर्षाची इंटर्नशीप केली. एमएसच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेताना तिला अपघात झाला.
