पुण्यातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ऋषिकेश वैद्य याला लष्कर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याला 9 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, पुन्हा पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. पिंपरीतील काळेवाडी परिसरातून मांजरी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास वैद्य याला अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. पुणे शहर पोलिसांच्या विशेष पथकांनी आणि मांजरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीकडून 5 मोबाईल फोन, व्हिडीओ, फोटो आणि चॅटिंगची माहिती अत्यंत महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच, घटनेत वापरण्यात आलेली चारचाकी गाडी जप्त करणे, पेनड्राईव्हसह इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे हस्तगत करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. पीडित महिलेने प्रसादातून गुंगीचे औषध देण्यात आल्याचा आरोप केल्यामुळे ते औषध नेमके कुठून आणले? याचाही तपास बाकी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी एक वेगळीच मागणी करत वैद्य हा ‘धर्मगुरू’ असल्याने त्याचे केशवपन करू नये, तसेच तुरुंग मॅन्युअलनुसार धर्मगुरूंना मिळणाऱ्या सुविधा देण्यात याव्यात, अशी विनंती न्यायालयाकडे केली. विशेष म्हणजे, त्याची शेंडी कापू नये, असा मुद्दाही मांडण्यात आला.
नेमकं प्रकरण काय?
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच पुण्यातील एका विवाहित महिलेने धाडस करून तक्रार दाखल केली. ऑक्टोबर 2023 मध्ये सोशल मीडियाद्वारे तिची ऋषिकेश वैद्यशी ओळख झाली. वैद्यने स्वतःला ‘महादेवाचा अवतार’ असल्याचे सांगत तिला आपल्या जाळ्यात ओढले.
पुण्यातील एका लॉजमध्ये भेटीदरम्यान त्याने महिलेच्या प्रसादात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वसई येथेही तिला बोलावून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, जो पुढे मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांच्या तपासानुसार, वैद्यने अशाच प्रकारे आणखी काही महिलांची फसवणूक आणि शोषण केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.
