मला रडायला येत नाही! 50 लाखांची खंडणी, शाळकरी मुलाला शेजाऱ्यानेच अपहरण करुन संपवलं, अटकेनंतर पश्चातापही नाही

 हनुमान जयंती शोभायात्रेतून अपहरण करून अवघ्या १४ वर्षांच्या शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली. सोमवारी गुन्हे शाखेने या घटनेचा उलगडा केला. जयराम गोपाल यादव (१९, रा. आयबीएमरोड), केतन उर्फ कुणाल रमेश साहू (२२, रा. कुतुबशाह मशिदीजवळ, गिट्टीखदान) आणि आयुष मोहन साहू (१९, रा. शिवशंकर मंदिरासमोर, मानकापूर) अशी मारेकऱ्यांची नावे आहे. अश्विन (नाव बदलले आहे) याचा शेजारी जय हाच या हत्येचा सूत्रधार आहे. अश्विन जयला दादा म्हणायचा, त्याच्यावर विश्वास असल्यानेच तो जयसोबत गेला. त्यामुळे पेशवाईच्या इतिहासातील ‘काका मला वाचवा’ची पुनरावृत्ती येथे झाल्याचे दिसून येते.

काय आहे प्रकरण?

अश्विनचे वडील दिलीप हे भाजीपाल्याचे थोक विक्रेते आहेत. तिन्ही आरोपीसुद्धा भाजी पाल्याचा व्यवसाय करतात. अश्विनच्या वडिलांकडून हे तिघेही अनेकदा भाजीपाला खरेदी करत. यातील आयुष हा पार्सल पोहोचविणाऱ्या कंपनीतही काम करतो. त्यासाठी त्याने महिंद्राची एक चार चाकी गाडीही घेतली होती. हीच गाडी आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. अश्विनचे अपहरण करून भाजीपाल्याचे थोक विक्रेते दिलीप यांच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा आरोपींचा डाव होता.

त्या दिवशी काय घडलं?

२ एप्रिल रोजी अश्विनच्या राहत्या घरासमोरून हनुमान जयंतीची शोभायात्रा जात होती. अश्विन या शोभायात्रेत होता. तेव्हा या परिसरात आईस्क्रिमचे वाटप सुरू होते. आईस्क्रिम खाल्ल्यानंतर ‘चल आपण एक फेरफटका मारून येऊ व बाथरूमला जाऊ’ असे सांगून जय अश्विनला घेऊन गेला. आयुष आणि कुणाल आधीच वाट पाहत होते. त्या तिघांनी अश्विनला आयुषच्या गाडीत बसविले व तेथून निघाले.

उंदीर मारण्याच्या औषधाचा वापर

जय हा अश्विनचा शेजारी होता, अश्विन त्याला दादा म्हणत असे. त्यांची चांगली ओळख होती म्हणूनच तो जयसोबत गेला. काही अंतर दूर गेल्यानंतर अश्विनने दादा आपण इतक्या दूर कसे काय आलो? असा प्रश्न केला. यावर जयने त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. या बोळ्याला उंदीर मारण्याचे औषध लावले होते. यामुळे अश्विन बेशुद्ध होईल असा आरोपींचा अंदाज चुकीचा ठरला. अश्विन आरडाओरडा करू लागला. अखेर या गोंधळात आरोपींनी कापडाच्या साहाय्याने अश्विनचा गळा आवळून खून केला. पुढे आरोपींनी अश्विनची बॉडी एका पोत्यात टाकली व कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा परिसरातील रिंगरोडलगत फेकून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *