21 वर्षाच्या तरूणाचा मसाज सेंटरच्या आड भलताच धंदा, पोलिसांकडून दोन तरूणींची सुटका; पुण्यातील पॉश परिसरात कारवाई

शहराच्या उच्चभ्रू चेहऱ्यामागे काय सुरू असतं, याचं धक्कादायक उदाहरण कल्याणीनगरमध्ये समोर आलं आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली येरवाडा परिसरात देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या धडक कारवाईत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पुण्यातील अत्यंत पॉश परिसरात झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

कसा केला पर्दाफाश?

शहरातील जॉगर्स पार्कजवळील ईश्वरधाम अपार्टमेंटमध्ये ‘निरा स्पा’ नावाने हे सेंटर सुरू होतं. बाहेरून सर्व काही नियमित स्पा सारखं दिसत असलं तरी आत मात्र वेगळंच चित्र होतं. मसाजच्या नावाखाली ग्राहकांना थेट देहव्यापाराची ऑफर दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती कितपत खरी आहे, याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवला आणि तिथे सुरू असलेला प्रकार उघड झाला.

माहिती पक्की होताच पोलिसांनी रात्री साडेआठच्या सुमारास छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत स्पा सेंटरचा मॅनेजर अरमान रहिमउद्दीन हुसेन याला अटक करण्यात आली. अवघ्या २१ वर्षांच्या या तरुणाकडून हा संपूर्ण प्रकार चालवला जात असल्याचं समोर आलं आहे. यावेळी पोलिसांनी दोन तरुणींना या जाळ्यातून बाहेर काढत त्यांची सुटका केली. प्राथमिक चौकशीत त्यांना पैशाचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलण्यात आल्याचं उघड झालं आहे.

संशयिताचा शोध सुरू

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) कायद्यानुसार आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता असून ‘राज’ नावाच्या संशयिताचा शोध सध्या सुरू आहे. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमूला आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

दरम्यान, इतक्या पॉश भागात अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याचं उघड झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. “स्पा सेंटरच्या नावाखाली नेमकं काय चालतंय, यावर आता कडक लक्ष ठेवायला हवं,” अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *