शहरात झालेल्या मुसळधार पावसात सिंहगड रस्त्यावर हृदयद्रावक घटना घडली असून, मंदिराशेजारी फुल विक्री करीत बसलेल्या महिलेच्या अंगावर भलेमोठे झाड कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या १५ ते २० वर्षांपासून रंजना गिरी या मंदिराशेजारी फूल विक्री करीत होत्या. उन्हात-पावसात आसरा देणारे हेच वडाचे झाड आज त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
रंजना नवनाथ गिरी (वय ६०, रा. दत्तवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.
नेमकं काय झालं?
पोलिस व अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, रंजना गिरी या गेली अनेक वर्षे सिंहगड रस्त्यावरील नवश्या मारुती मंदिराजवळ फुल विक्रीचा व्यवसाय करीत होत्या. गुरुवारी हनुमान जयंती असल्याने त्या सकाळपासूनच हातगाडीवर फुल विक्री करीत होत्या. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याच वेळी मंदिराशेजारील वडाचे मोठे झाड हातगाडीवर कोसळले. या घटनेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून रंजना गिरी या उन्हात-पावसात याच वडाच्या झाडाखाली व्यवसाय करीत होत्या. हे झाड त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले होते; परंतु नियतीचा क्रूर खेळ असा, की अनेक वर्षे सावली देणारे तेच झाड अखेर त्यांच्या जीवावर बेतले. वादळी वाऱ्यात कोसळलेल्या त्या झाडाने होत्याचे नव्हते केले. ज्या झाडाखाली आयुष्य जगले, त्याच झाडाच्या रूपाने काळाने त्यांच्यावर घाला घातल्याची हळहळ परिसरात व्यक्त होत आहे, अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पोटे यांनी दिली.
महिलांनी सांगितला थरार
“गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वारे आणि पावसाला सुरुवात झाली. आम्ही शेडमध्ये जाऊन उभे राहिलो, मात्र रंजना गिरी या झाडाच्याच आडोशाला बसल्या होत्या. जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि वारं सुटायला लागलं. अचानक झाड कोसळून रंजना ताई त्याखाली अडकल्या. दुर्दैवाने या धक्कादायक घटनेत त्यांचा मृत्यू झाला” अशी माहिती रंजना गिरी यांच्यासोबत रोज असलेल्या महिलांनी दिली.
