मुंबईत बुधवारी एका मोठ्या व्यवहाराची नोंद झाली. मुंबईत पार पडलेल्या लिलावात राजा रवी वर्मा यांचं प्रसिद्ध ‘यशोदा आणि कृष्ण’ पेटिंगची विक्रमी रकमेत विक्री झाली आहे. हे पेंटिंग तब्बल 167 कोटींना विकलं गेलं आहे. पुण्याती प्रसिद्ध उद्योगपती डॉ. सायरस एस पूनावाला यांनी हे पेटिंग खरेदी केलं आहे. मॉडर्न इंडियन आर्ट लिलावात विकली गेलेली ही आतापर्यंतची सर्वात महागडी पेटिंग ठरली आहे.
‘सॅफ्रनआर्ट’च्या (Saffronart) ‘स्प्रिंग लाइव्ह ऑक्शन’मध्ये, राजा रवी वर्मा यांचे गाजलेले चित्र ‘यशोदा आणि कृष्ण’ हे विक्रमी 167.20 कोटींना विकलं गेलं आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सायरस एस. पूनावाला यांनी राजा रवी वर्मा यांचे ‘यशोदा आणि कृष्ण’ हे प्रतिष्ठित पेंटिंग विकत घेतलं असून लिलावाद्वारे आधुनिक भारतीय कलेच्या एखाद्या कलाकृतीसाठी आतापर्यंत मोजल्या गेलेल्या सर्वाधिक किमतीचा नवा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला आहे.
पीटीआयने यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी मुंबईत ‘सॅफ्रनआर्ट’च्या (Saffronart) ‘स्प्रिंग लाइव्ह ऑक्शन’मध्ये, लिलावादरम्यान हे चित्र 167.20 कोटींना विकलं गेलं. या विक्रीने एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून, गेल्या वर्षी एम.एफ. हुसेन यांच्या ‘अनटायटल्ड (ग्राम यात्रा)’ या कलाकृतीने नोंदवलेला 118कोटींहून अधिक रुपयांचा मागील लिलाव विक्रम या विक्रीने मोडीत काढला आहे.
राजा रवी वर्मा आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना, 1890 च्या दशकात त्यांनी हे चित्र काढलं होतं. ‘यशोदा आणि कृष्ण’ या चित्राचे अंदाजित मूल्य 80 ते 120 कोटी रुपये इतके होते. पूनावाला यांनी पेंटिंग खरेदी केल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “राजा रवी वर्मा यांचे हे प्रतिष्ठित चित्र खरेदी करण्याची, त्याचे जतन करण्याची आणि त्याची निगा राखण्याची संधी मला लाभली, हे मी माझं भाग्य समजतो. या राष्ट्रीय ठेव्याचे वेळोवेळी जनतेसाठी प्रदर्शनास उपलब्ध करून दिले जाणे उचित आहे; आणि भविष्यात तसे घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे, हेच माझे उद्दिष्ट असेल.”
हे तैलचित्र भगवान श्रीकृष्ण आणि यशोदा या पौराणिक पात्रांच्या माध्यमातून वात्सल्याचं सविस्तर चित्रण करण्यात आलं आहे. यामध्ये यशोदा माता एका गाईचे दूध काढत असल्याचे, तर श्रीकृष्ण मागून दुधाचा प्याला घेण्यासाठी हात पुढे करत असल्याचं दर्शविलं आहे. राजा रवि वर्मा यांच्या सर्वात महत्त्वपूर्ण आणि भावपूर्ण कलाकृतींपैकी एक म्हणून तिला गणलं जातं.
