महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांमध्ये आता आणखी एका मार्गाचं नाव जोडलं जाणार आहे. एकीकडे समृद्धी महामार्गानं महाराष्ट्राचा विकास वेगानं पुढे नेला असतानाच दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गामुळं राज्यातील रस्ते प्रवासाला बळ मिळणार आहे असंच म्हणावं लागेल. याच महामार्गासंदर्भातील साताऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली. ज्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग साताऱ्यातून पुढे जाणार असल्याचं स्पष्ट झालं. तब्बल 13 जिल्हे, 40 चालुके आणि 400 गावं जोडणाऱ्य़ा या महामार्गामुळं गोव्याला जाणंही आता अगदी सोपं होणार आहे. राज्यशासनानं नुकताच या प्रकल्पासंदर्भातील सुधारित आराखडा जारी केल्यामुळं राज्याच्या कोणत्या भागांना या महामार्गाचा थेट फायदा मिळणार हेसुद्धा स्पष्ट झालं आहे.
साताऱ्याला मिळणार शक्तीपीठ महामार्गाचं बळ
राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात आता अतिशय महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. परिणामी हा महामार्ग सातारा जिल्ह्यातून पुढे जाणार आहे. मार्ग बदलल्यामुळे प्रकल्पाचा खर्च 1 लाख एक हजार कोटींवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांनी महामार्गासाठी जमिनी देण्यास केलेल्या तीव्र विरोधामुळे राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द केली. ज्यानंतर आता या मार्गाची सुधारित आखणी तयार करण्यात आली आहे.
सुधारित आराखड्यानुसार नागपूर ते गोवा दरम्यान सुमारे 760 किमी लांबीचा हा महामार्ग शेकडो गावं जोडणार आहे. ज्यामध्ये नागपूर ते गोवा हे अंतर 18 तासावरून 8 तासांवर येणार आहे. महाराष्ट्रातील 13 जिल्हे, 40 तालुके आणि सुमारे 400 गावे जोडली जाणार आहेत. ज्यामुळं माहूर, तुळजापूर, कोल्हापूर या शक्तीपीठांसह जवळपास 21 धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत.
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या पूर्व-पश्चिम भागांतील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. फेब्रुवारी 2024 मध्येच या महामार्गाच्या मूळ आराखड्याला मान्यता मिळाली होती. ज्यानुसार हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांतून जाणार होता. पुढं हा महामार्ग कोकण एक्स्प्रेसवेला महाराष्ट्र- गोवा हद्दीवर जोडला जाण्याचा प्रस्ताव होता. मात्र कोल्हापूर आणि सांगलीतील शेतकरी, जमीन धारकांकडून या प्रकल्पाचा विरोध करण्यात आला. ऐन निवडणुकीच्याच तोंडावर महामार्गासाठी जमीनी देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिल्यानं महामार्ग करण्यात आला, ज्यानंतर आता त्याच्या सुधारित आराखड्यास मान्यता मिळाली आहे.
कसा आहे सुधारित आराखडा?
राज्य शासनाची मान्यता मिळालेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यानुसार आता हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूरमध्ये मूळ आखणीनुसारच कायम असेल. तर, उर्वरित जिल्ह्यांमध्ये या महामार्गाच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे ज्यामध्ये साताऱ्याच्याही नावाचा समावेश आहे. नव्या आखणीनुसार वर्ध्यातील दिग्रज ते सिंधुदुर्गातील बांदा अशा अंतरादरम्यान हा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत असेल.
कोणत्या शक्तीपीठांसह तीर्थक्षेत्रांना जोडणार हा महामार्ग?
माहूरगड, तुळजापूर आणि कोल्हापूर ही शक्तीपीठं आणि अंबेजोगाई या महामार्गानं जोडली जाणार आहेत. याशिवाय अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही गुरुस्थळंसुद्धा शक्तीपीठ महामार्गानं जोडली जाणार आहेत. याशिवायही पंढरपूर, ज्योतिबा, परळी वैद्यनाथ, औंढा नागनाथ अशा तीर्थक्षेत्रांसह इतरही ठिकाणांना या शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेनं सहज पोहोचता येईल. समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जाणारा गोवासुद्धा या महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असून, त्यानिमित्तानं पुरातन आणि सुबक स्थापत्य असणाऱ्या गोव्यातील मंदिरांचीही सफर या महामार्गामुळं वाट वळवून सहजपणे करता येणार आहे.
