कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचं रुप पालटून दुहेरी हत्यात बदलल्याची घटना घडली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे थोरला भाऊ संभाजी मारुती कुंडले (वय ४७) याने वडील मारुती बंडू कुंडले (वय ७२) आणि धाकटा भाऊ शीतल मारुती कुंडले (वय ४५) यांच्यावर कुऱ्हाड आणि खोऱ्याने वार केले. दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, संभाजी स्वतः हातकणंगले पोलिस ठाण्यात हजर होऊन त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यात संभाजीचा मुलगा विवेक हा जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
भावांमध्ये सतत वाद
हिंगणगाव येथील कुंडले कुटुंबातील आजोबा बंडू कुंडले यांच्या नावावर तीन एकर शेती आहे. यापैकी दोन एकर शीतल कुंडले आणि वडील मारुती बंडू कुंडले यांच्याकडे तर उर्वरित एक एकर संभाजीकडे होती. या वाटणीवरून गेल्या काही वर्षांपासून भावांमध्ये सतत वाद होत होते. घरात नेहमी तणावाचे वातावरण असायचे. चार दिवसांपूर्वीच या जमिनीच्या वादासंदर्भात हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. मात्र, तिची वेळेत दखल घेतली असती, तर ही दुर्दैवी घटना टळली असती, अशी ग्रामस्थांची भावना आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पार घालून त्यांना जखमी केल्याचीही माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी रक्तरंजित दृश्य
काल रविवारी दुपारी हिंगणगाव जवळील गट नंबर 484 मधील शेतात वडील मारुती आणि भाऊ शीतल कामात व्यस्त असताना संभाजी तिथे आला. शेती वाटणीवरून शाब्दिक चकमक उडाली आणि रागाच्या भरात त्याने कुऱ्हाड आणि खोऱ्याने दोघांच्या डोक्यात वर्मी घाव केले. पार्थिव मृतांच्या घराच्या मागील विहिरीजवळ सापडले. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रे जप्त केली असून, संभाजीचा मुलगा विवेकचा गुन्ह्यात सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे.
पोलिसांची तत्परता, परिसरात भीती
घटनेची माहिती पसरताच हिंगणगाव आणि कुंभोज परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. पोलिस उपनिरीक्षक शरद मेमाणे, सहायक पीआय यादव आणि उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले आहेत. पार्थिव शवविच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात नेले गेले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झालेल्या संभाजीला ताब्यात घेतले असून, विवेकची उपचारानंतर चौकशी होईल. पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
