पुण्यात संतापजनक घटना; PMP बसमध्ये कंडक्टरकडूनच अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

 रोजच्या प्रवासासाठी पुणे शहरात लोक ज्या व्यवस्थेवर भरोसा ठेवतात, त्या PMP बसमध्येच अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे. शहरात समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी नागरिकांमध्ये संताप आणि चिंता दोन्ही वाढवल्या आहेत.

पहिली घटना कात्रज ते स्वारगेट या मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये घडली. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत बसच्या वाहकानेच गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान पीएमपी बसच्या वाहकाने मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत तिला मोबाईल नंबर देण्याचा आग्रह केला. मात्र मुलीने नकार दिल्यानंतरही त्याने आपलं वर्तन सुधारलं नाही. उलट तिला अयोग्य स्पर्श करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने जोरात आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून बसमधील प्रवासी तत्काळ पुढे आले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत त्यांनी बस थांबवून आरोपीला पकडलं. मुलीकडून माहिती घेतल्यानंतर संपूर्ण प्रकार स्पष्ट झाला आणि संतप्त प्रवाशांनी आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं. या प्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दाखल केली असून, आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

सिंहगडमध्येही धक्कादायक प्रकरण समोर

शहरातील दुसऱ्या घटनेनेही संताप व्यक्त केला जात आहे आहे. सिंहगड रस्ता परिसरात एका १० वर्षांच्या मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप ६६ वर्षीय व्यक्तीवर करण्यात आला आहे. हा प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर उघडकीस आला असून आईने तात्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनांमुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *