सहाव्या अन् सातव्या मजल्यांमध्ये लिफ्ट अडकली, बाहेर निघण्याचा जिवाच्या आकांताने प्रयत्न; पुण्यात तरुणाचा लिफ्टमध्येच अंत

शहारातील तळेगाव दाभाडे येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ‘निसर्ग हौसिंग सोसायटी’मध्ये लिफ्टची केबल तुटून झालेल्या भीषण दुर्घटनेत दिनेश सुरंगे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन पुंडलिक वारके यांच्यासह ११ सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?

‘निसर्ग हौसिंग सोसायटी’ची लिफ्ट अचानक सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या मध्ये अडकली. त्यावेळी दिनेश आतमध्येच होता. लिफ्ट बंद पडल्याचं लक्षात येताच सोसायटीतील लोकांनी लगेच धाव घेतली. ‘घाबरू नको, आम्ही तुला बाहेर काढतो’ असं सांगत त्याला धीर दिला जात होता. काहीजण लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न करत होते. पण अचानक सगळं उलटलं. बचावकार्य सुरू असतानाच लिफ्टची मुख्य केबल तुटली आणि जोराच्या आवाजासह लिफ्ट थेट खाली कोसळली आणि या अपघातात दिनेशचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की दिनेशला वाचवण्याची संधीच मिळाली नाही.

या घटनेनंतर सोसायटीत एकच खळबळ उडाली. रहिवासी घाबरलेले आणि संतापलेलेही दिसत होते. ‘लिफ्ट आधीपासूनच नीट नव्हती, आवाज येत होते, पण कोणी गांभीर्याने घेतलं नाही,’ असं काही सोसायटीतल्या नागकिरांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली आहे. सोसायटीचे चेअरमन पुंडलिक वारके, दीपक हेंद्रे, विनायक खोराटे, नीलेश गवळी, प्रवीण श्रीवास आणि इतर अशा एकूण ११ पदाधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हलगर्जीपणामुळे तरुणाचा बळी

प्राथमिक तपासात लिफ्टची नियमित देखभाल आणि तपासणी करण्यात मोठी हलगर्जीपणा झाल्याचं समोर आलं आहे. याच निष्काळजीपणामुळे हा जीवघेणा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पण निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा जीव गेला, आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला हीच या घटनेची खरी वेदना आहे. त्यामुळे लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *