गाणगापूरला जाताना वाद, भररस्त्यात बायकोचा जीव घेतला; बारामतीकर तरुणाला अटक

कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यात पत्नीची अमानुष पद्धतीने हत्या केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून या घटनेनं संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. बारामती येथील अक्षय आणि शैला हे दाम्पत्य देवदर्शनासाठी गाणगापूरला गेले असताना हा भीषण प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यातील किरकोळ वादातून संतापलेल्या अक्षयने पत्नी शैलाला कारमधून ओढून बाहेर काढत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

महिलेचा जागीच मृत्यू

अक्षयने धारदार शस्त्राने शैलाचागळा चिरला. तो इतक्यावरच न थांबता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवरून कार चालवत तिला चिरडलं, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या अमानुष कृत्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी अक्षयला अटक केली असून, ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. देवदर्शनाच्या बहाण्याने पत्नीला कर्नाटकात आणून हा कट रचल्याची शक्यता पोलीस तपासत आहेत.

नागरिकांची मध्यस्थी अन्…

हा संतापजनक प्रकार पाहून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. नागरिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार काही स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात देखील कैद केला आहे. नागरिक तिथे असेपर्यंत आरोपी मी काहीच करत नसल्याचं भासवत होता. मात्र, नागरिक बाजूला होताच त्याने क्रूरतेचा कळस गाठला.

पत्नीला कारखाली चिरडलं

मारहाणीमुळे रस्त्याच्या कडेला पडलेल्यापत्नीवर आरोपी पतीने थेट कार चढवली. अत्यंत अमानुषपणे कार खाली चिरडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन या २८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यानं पतीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पुण्यात प्रेमविवाहाचा भयंकर शेवट

पुण्यातल्या कात्रज भागात एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर जुळलेलं प्रेम, त्यातून झालेला विवाह, पण त्यानंतर सुरू झालेला छळ अखेर एका २० वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला. पत्नी आणि तिच्या माहेरच्यांच्या कथित त्रासाला कंटाळून तरुणाने उंदीर मारायचं औषध पिऊन मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहम्मद साद (साद) आसीफ सय्यद असं मृत तरुणाचं नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *