पुण्यात ACBची मोठी कारवाई; 2 लाखांची लाच घेताना प्रांताधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं, महसूल विभागात खळबळ

इमारतीचे ९० टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अंशतः पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती दोन लाख रुपये स्वीकारताना जुन्नर-आंबेगावच्या प्रांताधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. मंचर येथील सरकारी कार्यालयात शुक्रवारी (२७ मार्च) दुपारी झालेल्या या कारवाईने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

गोविंद पंढरीनाथ शिंदे (वय ४६, रा. प्रभात रस्ता, मूळ रा. सोनारी, नाशिक) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत, ४८ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

गोविंद शिंदे हा जुन्नर-आंबेगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी आहे. तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाची भागीदारी बांधकाम कंपनी आहे. त्यांनी पुणे-नाशिक महामार्गालगत नारायणगाव येथे संयुक्त प्रकल्पात इमारत बांधणीचे काम हाती घेतले होते. या इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर अंशतः पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी त्यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे याच्याकडे प्रस्ताव सादर केला. शिंदे याने हा प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठवून त्यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन तो स्वतःकडे राखून ठेवला.

मागील आठवड्यात तक्रारदार या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी गेले. त्या वेळी शिंदे याने अंशतः पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार, मंचर कार्यालयात गोविंद शिंदे यांना तक्रारदाराकडून तडजोडीअंती दोन लाखांची लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या पथकाने पकडले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *