अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील कोंडी फुटणार; चार पदरी उड्डाणपुलामुळे प्रवास सोपा; कुर्ला ते घाटकोपर जोडणार

कुर्ला ते घाटकोपर प्रवास करताना लाल बहादूर शास्त्री मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होते. पूर्व मुंबईतील सर्वाधिक कोंडी असलेल्या मार्गांपैकी हा एक आहे. या मार्गासाठी पर्याय म्हणून महापालिकेने कुर्ला ते घाटकोपरदरम्यान 4.25 किमी लांब उड्डाणपुलाचं काम हाती घेतलं आहे. बीएमसीकडून या पुलाचं बांधकाम सध्या सुरू आहे.

अनेक प्रवाशांना पर्यायी मार्ग

सध्या एलबीएस मार्गावर अनेक ‘बॉटलनेक’ आहेत. सकाळी व सायंकाळी पीक अव्हरदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या जंक्शनवर अंधेरी घाटकोपर लिंक रोड, घाटकोपर रेल्वे स्थानक व संत नरसी मेहता रोड या मार्गांवरून येणारे प्रवासी प्रवास करत असल्यामुळे चोक पॉइंट तयार होतो. यामुळे या सर्व मार्गांवरील प्रवासी त्रस्त आहेत. हा नवीन उड्डाणपूल तयार होताच प्रवाशांना या चोक पॉइंट आणि जंक्शवर न जाता, पर्यायी मार्ग मिळणार आहे. तसेच, अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरी प्रवाशांसाठीही हा पर्यायी उन्नत मार्ग उपलब्ध होणार आहे.

कसा असेल मार्ग?

कुर्ला ते घाटकोपर उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ केवळ 10 मिनिटांवर येणार आहे. 3-4 किमीचे अंतर असले तरी कोंडीच्या वेळी कुर्ला ते घाटकोपर जाताना अर्धा तास लागतो. नव्या उड्डाणपुलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. हा नवीन उड्डाणपूल 4.25 किमी लांब असून याचा प्रमुख भाग 3.91 किमी लांब असेल. शिवाय कुर्ल्याच्या दिशेने 146 मीटरच्या रॅम्पसह घाटकोपरच्या दिशेने 180 मीटरचा रॅम्प असेल. हा उड्डाणपूल चार पदरी असणार असून मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे.

या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 3,156 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेने या पुलासाठी 2029ची डेडलाइन दिली असल्यामुळे मुंबईकरांना आणखी काही वर्ष या उड्डाणपुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यात काही अडथळे आले तर ही तारीख आणखी लांबण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *