बहुचर्चित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्याबाबतचे अनेक किस्से त्याच्या अटकेनंतर पुन्हा चर्चेत आले आहेत. कहांडळवाडी येथून कोंबडीचोरीच्या आरोपामुळे गाव सोडून गेल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी ‘हाँगकाँग रिटर्न कॅप्टन’ म्हणून तो परतला, ही कहाणी आजही गावकऱ्यांसाठी गूढ आणि तितकीच चर्चेची ठरली आहे.
कोंबडीचोरीनंतर पलायन
सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथे गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला अशोक उर्फ लक्ष्मण गावात ‘खोडकर’ म्हणून ओळखला जात होता. शेतकऱ्यांच्या अंगणातील कोंबड्या चोरणे, अंडी चोरून विकणे अशा प्रकारांमुळे त्याची गावात बदनामी झाली होती. सुमारे १९८४ च्या सुमारास एका कोंबडीचोरीच्या प्रकरणात तो पकडला गेला आणि गावात मोठा गोंधळ उडाला. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या चोरीला गेलेल्या कोंबड्यांचा संशय त्याच्यावर घेतला. अखेर वडिलांनीही संतापून त्याला घराबाहेर काढल्याचे सांगितले जाते.
नानांनी पन्नास रुपये टेकवले
त्या रात्री गावातील एका परिचिताकडे मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो नोकरीच्या शोधात बाहेर पडणार असल्याचे सांगून निघाला. गावातील एका नानांनी त्याला खर्चासाठी ५० रुपये दिले आणि त्यांच्या सायकलवर बसवून वावी बसस्थानकात सोडले. तेथे भेटलेल्या मामांनीही त्याला आणखी ५० रुपये दिले. असे दोघांकडून मिळालेले शंभर रुपये खिशात घालून अशोकने गावाचा निरोप घेतला.
त्यानंतर अनेक वर्षे अशोक खरात कुठे आहे, काय करतो, याचा कोणालाच मागमूस नव्हता. मात्र, तब्बल बारा वर्षांनंतर वावी बसस्थानकात सोडणाऱ्या त्या नानांना थेट हाँगकाँगमधून त्याचे पत्र आले. त्यात ‘मी इथे कामाला लागलो आहे, मजेत आहे, लवकरच भेटायला येईन,’ असे लिहून त्याने नानांनी दिलेल्या त्या पन्नास रुपयांची आठवण करून आभारही मानले होते.
‘कॅप्टन’ म्हणून गावात झाले पुनरागमन
साधारण १९९४-९५ च्या सुमारास अशोक पुन्हा गावात आला. मात्र, यावेळी त्याची ओळख होती ‘कॅप्टन’. आपण नेव्हीत कॅप्टन पदावर असल्याची बतावणी तो करू लागला. त्याचे राहणीमानही बदललेले दिसत असल्याने गावकऱ्यांमध्ये त्याच्याबद्दल कुतूहल आणि अप्रूप निर्माण झाले.
गावकऱ्यांची सावध भूमिका
‘कॅप्टन’चे कोलकात्यातील ‘प्रताप’ समजल्यानंतर गावात एकप्रकारची भीती निर्माण झाली होती. कॅप्टन गावात आला, की तरुणांना त्याच्या संपर्कात येऊ न देण्याची खबरदारी गावकरी घेऊ लागले. ‘तो एखाद्याला सोबत घेऊन जातो आणि पुन्हा परत येऊ देत नाही,’ अशीही चर्चा त्या काळात गावात रंगत होती. त्यामुळे अनेकजण त्याच्यापासून अंतर राखून होते.
कोलकात्याला सोबत न्यायचा
गावी आल्यानंतर त्याने वावी येथील एका व्यावसायिकाकडून जुनी जीप विकत घेतली. गावातील एका मित्राला ड्रायव्हिंग येत असल्याने ‘आपण जीपने कोलकात्याला जाऊ, माझे काम आटोपले की परत येऊ,’ असे सांगून तो त्याला सोबत घेऊन गेला. मात्र, सुमारे दोन महिन्यांनी तो चालक मित्र एकटाच गावात परतला आणि कॅप्टनबद्दल संताप व्यक्त करू लागला. कोलकात्यात कॅप्टनचे काही मित्र गुंडगिरी करणारे असून, त्यांच्या हातात विविध हत्यारे असत, तसेच विचित्र पदार्थांची नशा केली जात असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे भीतीपोटी आपण तेथून पळ काढल्याचे त्याने गावकऱ्यांना सांगितले.
निरक्षर असलेल्या त्या चालकाला बंगाली भाषा येत नव्हती. मात्र, काही ट्रकचालकांच्या मदतीने ‘शिर्डी साईबाबा’ एवढेच सांगत तो नागपूरपर्यंत पोहोचला आणि तेथून पुढे शिर्डी गाठल्याची त्याची कहाणी गावात चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती.
