महाराष्ट्रात सध्या अशोक खरात प्रकरणानं खळबळ माजलेली असतानाच आता असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. खरातप्रकरणी नवनवीन आणि तितकेच हादरवणारे खुलासे तपासातून समोर येत आहेत. याचदरम्यान आणखी एका धर्मगुरूच्या दुष्कृत्यांना वाचा फुटली आहे.
‘मी शंकर आहे असून तू माझी पार्वती’
‘मी शंकर आहे असून तू माझी पार्वती आहेस, असं सांगून एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरूचा नुकताच पर्दाफाश झाला आहे. ऋषिकेष वैद्य असं त्याचं नाव असून, याच्याविरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
35 वर्षांच्या महिलेवर अत्याचार
उपलब्ध माहितीनुसार पीडित महिला 35 वर्षांची असून पुण्यात राहते. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 2023 मध्ये तिची ओळख या व्यक्तिशी झाली होती. वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू आणि आमची वसई या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवरुन तिची ओळख झाली. त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने जवळीक साधली.
डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात गेला. तिथं, ‘मी महादेवाचा अवतार आहे. तू माझी पार्वती आहेस’ असे सांगून त्यानं तिला भुलवलं. यानंतर तिला पुण्यातील मांजरी इथं एका लॉजमध्ये नेलं तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. या काळात वैद्य याने तिच्या नकळत तिची अश्लील छायाचित्रंही काढली होती.
अश्लील छायाचित्रांच्याच माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करु लागला, फोटोंच्या माध्यमातून तो तिला पुन्हा भेटायला बोलावत होता. मे 2025 मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये पीडित महिलेला भेटायला बोलावून त्यानं तिच्यावर पुन्हा अत्याचार कऱण्याचा प्रयत्न केला. सध्या राज्यात नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाचं बिंग फुटल्याचं पाहून पीडितेनं धाडस दाखवत पतीला हा प्रकार सांगितला. ज्यानंतर बुधवार 25 मार्च रोजी वसईच्या माणिकपूर पोलीस तक्रार दाखल केली. ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात ही तक्रार दाखल केली. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असल्यानं हे प्रकरण हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलिसांनी दिली.
दरम्यान खरातप्रमाणंच या कथित धर्मगुरूनं अनेक मुलींची फसवणूक केल्याची माहिती आहे. ऋषिकेश वैद्य यानं आपण धर्मगुरू असल्याचं भासवून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं पीडित महिलेनंच पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलं.
