सध्या सोशल मीडियावर ओळख ही एक आता सोप्पी गोष्ट झाली आहे. तसेच सोशल मीडियावरील प्रेम आणि फसवणूकही तितकीच विशेष गोष्ट राहिलेलील नाहीय. रोज एक ना अनेक अशा घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र, फसवणूक करणारेही कोणत्या थराला जातात, याचं एक उदाहरण देणारी घटना पुण्यामध्ये घडली आहे.
कुत्रा दाखवतो म्हणत…
पुण्यातील सहकारनगर परिसरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. ओळख झाली त्यानंतर हळूहळू मैत्री वाढली आणि तरुणाने अल्पवयीन मुलीला घरातील ‘कुत्रा दाखवतो’, म्हणत आपल्या घरी बोलावले. त्या अल्पवयीन मुलीला आपण नंतर लग्न करू म्हणत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या सर्व प्रकारातून अल्पवयीन मुलगी गर्भावती राहिली. प्रथमेश ज्ञानेश्वर राऊत (वय २३, रा. बालाजी हाईटस, धनकवडी) असं या आरोपीचं नाव असून सहकारनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत १६ वर्षीय युवतीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा धक्कादायक प्रकार नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान घडला आहे.
तक्रारीत काय म्हटलंय?
‘कुत्रा दाखवतो’, म्हणून जेव्हा आरोपीने अल्पवयीन मुलीला घरी बोलावले तेव्हा त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ‘या सर्व गोष्टी कॉमन आहेत’, असं म्हणत त्याने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी त्या तरुणीला उलटीचा त्रास होऊ लागला. चेकअप केल्यानंतर मुलीला धक्का बसला. अल्पवयीन मुलगी १० आठवड्यांची गर्भावती आहे असं समजलं.
अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करत आहेत. मात्र, अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अल्पवयीन मुलींना फसवण्याचे प्रकार वाढत असून याची गंभीरता ओळखून मुलींनीही स्वतःला आणि पालकांनी मुलींना सावध करण्याचं या घटनेतून समजत आहे. दरम्यान, या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त होत आहे
