एका मोबाइल ॲपने दिलेल्या ‘उत्तरां’वर विश्वास ठेवून गावातील आठशे वर्षांहून अधिक इतिहास असलेले मंदिर पाडण्याचा सल्ला दिला गेला आणि क्षणभर ग्रामस्थही गोंधळले. पण त्यांनी त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज वावीतील सन १२१७ सालात उभारलेले यादवकालीन वैजेश्वर मंदिर सुरक्षित आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी हे मंदिर पाडण्याचा अजब सल्ला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरातने दिला होता. गावात या जुन्या घटनेची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
गावातील काही तरुणांनी वैजेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत मार्गदर्शन मिळावे, म्हणून अशोक खरातला बोलावले होते. मंदिराची पाहणी केल्यानंतर त्याने थेट ‘मंदिरात ऊर्जा उरलेली नाही, शिवलिंगाची शक्ती क्षीण झाली आहे. गावासाठी हे मंदिर अरिष्ट ठरू शकते. त्यामुळे हे मंदिर रातोरात पाडून नव्याने बांधा,’ असा सल्ला दिला, अशी माहिती ग्रामस्थ सांगतात. हा सल्ला ऐकून काही काळ ग्रामस्थही गोंधळून गेले. कारण अशोक खरात हा दावा मोबाइलमधील एका ॲपच्या आधारे करत असल्याचे ते दाखवत होते.
ग्रामस्थांची हुशारी
इतिहासाच्या नोंदीनुसार वैजेश्वर मंदिर हे काशी विश्वेश्वराचे स्थान मानले जाते. त्याची निर्मिती यादवकालात, इसवी सन १२१७ मध्ये झाल्याचे सांगितले जाते. शिवाय हे मंदिर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली असल्याने त्यात कोणतीही छेडछाड केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन वावी ग्रामस्थांनी वरकरणी ‘हो-हो’ म्हणत मान डोलवली; मात्र खरात निघून गेल्यानंतर ‘या भानगडीत पडायचे नाही,’ असा निर्णय घेत विषयालाच बगल दिली.
..अनर्थ टळला
आता गावात अशीही चर्चा रंगली आहे की, स्वतःच्या ईशान्येश्वर मंदिराचे महात्म्य वाढावे, या कुटील हेतूनेच अशोक खरातने वैजेश्वर मंदिर पाडण्याचा सल्ला दिला होता. त्या वेळी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर गावातील हे ऐतिहासिक मंदिर कायमचे नष्ट झाले असते. शिवाय कायदेशीर अडचणीही ओढवल्या असत्या, अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणांनीही आता ‘त्या वेळी हा विषय पुढे नेला नाही, हेच बरे झाले,’ असे म्हणत सुटकेचा निश्वास सोडला आहे.
