उन्हाळ्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ, मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष ट्रेन; सीएसएमटी-मडगाव अतिरिक्त फेऱ्या

उन्हाळी प्रवासी मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगावदरम्यान ३ व ५ एप्रिलला चार विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर आणि पुणे-नागपूर मार्गावर प्रत्येकी दोन फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. विशेष फेऱ्यांचे आरक्षण मंगळवारपासून खुले झाले आहे.

कसं असेल वेळापत्रक?

गाडी क्रमांक ०११२९ सीएसएमटी येथून मध्यरात्रीनंतर १२.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुपारी ३.१५ वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास (०११३०) मडगावहून दुपारी चार वाजता सुरू होईल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ ला पूर्ण होईल. दादर, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर विशेष रेल्वे थांबणार आहे.

गाडी क्रमांक ०१०२१ एलटीटी-नागपूर ही ३ एप्रिलला मध्यरात्रीनंतर १२.५५ ला सुटेल आणि नागपूरला दुपारी ३.४५ ला पोहोचेल. परतीचा प्रवास (०१०२२) नागपूरहून त्याच दिवशी रात्री ८ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ला एलटीटी येथे पूर्ण होईल. गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य डबे उपलब्ध आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेकडून एप्रिल-मे महिन्यात गावी जाणाऱ्यांसाठी 1500 विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. यामध्ये निम्म्याहून अधिक फेऱ्या उत्तर भारतासाठी सोडल्यामुळे कोकणवासियांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *