राजस्थान बोर्डाने दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत 94.23 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान सिम्स निथरवाल या विद्यार्थिनीने परीक्षेतील आपल्या निपुण कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवत एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. तिने 600 पैकी 595 गुण मिळवत राज्यात तिसरा आणि सीकर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
सिम्स ही रिंगस येथील सेंट्रल चिल्ड्रेन ॲकॅडमी हायर सेकंडरी स्कूलची विद्यार्थिनी आहे. मुकेश कुमार निथरवाल यांच्या मुलीने आपल्या कामगिरीने शाळा, जिल्हा आणि राज्याची मान उंचावली आहे. “हे यश मी माझे आई-वडील आणि माझ्या शाळेच्या परिवाराला मी समर्पित करते. भविष्यात मला IAS अधिकारी व्हायचं असून, हेच माझं ध्येय आहे”, अशी भावना तिने व्यक्त केली आहे. तिचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत.
सिम्सच्या यशानंतर तिच्या शिक्षकांनी आणि शाळेने समर्पण, कठोर परिश्रम आणि शिस्तीचं कौतुक केलं आहे. तसंच तिची कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं म्टलं आहे.
सिम्सने आई-वडिलांना दिलं यशाचं श्रेय
सिम्सने आपल्या यशाचं श्रेय आपले शिस्तप्रिय वडील आणि आईला दिलं आहे. आईने नेहमीच आपल्या पाठिंबा दिल्याचं तिने म्हटलं आहे. आई-वडिलांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला नेहमीच उत्कृष्ट करण्याची प्रेरणा मिळाली आणि आपण हे ध्येय गाठू शकलो असं तिने म्हटलं आहे. दरम्यान तिला भविष्यात काय व्हायचं आहे असं विचारलं असता तिने आयएएस अधिकारी व्हायचं आहे असं सांगितलं. “एक IAS अधिकारी बनणं हे माझं स्वप्न आहे,” असं ती म्हणाली.
राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाने (RBSE) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचे 2026 सालाचे निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच इयत्ता पाचवी आणि आठवीचे निकालही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यावर्षी दहावीचा एकूण उत्तीर्ण टक्का 94.23 टक्के इतका राहिला. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 2,72,252 आणि 2.83,411 मुलींचा समावेश आहे.
उत्तीर्ण मुलांचे प्रमाण 93.63 टक्के आहे, तर 94.90 टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेला एकूण 10.68 लाख विद्यार्थी बसले होते. या परीक्षा 12 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.
