कल्याणमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शहरातील 90 फूट रोडवर घडली असून घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. या रोडवर मागील काही काळात वारंवार अपघात होत आहेत. हे अपघात का होतात? नुकत्याच झालेल्या अपघातात काय झालं पाहूयात…
सायकलस्वारचा जागीच दुर्दैवी मृत्यू
कल्याणमधील गांधारी परिसरातील 90 फूट रोड हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय. मंगळवारी रात्री एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने जात असणाऱ्या सायकलस्वाराला जोरदार धडक दिली. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून यात चुकी कारचालकाची असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. या धडकेत सायकलस्वारचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून कारचालक फरार झाला आहे. कल्याण रिंग रोड हायवे प्रकल्पातील हा रस्ता म्हणजे कारचालकांना मोकाटपणे भरधाव कार चालवण्यासाठीच आंदण दिलाय का असा प्रश्न निर्माण होत आहे.
पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी
रिंगरोड हा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नसतानाही या ठिकाणी अनेकजण आपली कार चालवण्याची हौस भागवण्यासाठी अतिवेगाने वाहने पळवतात त्यामुळे रस्त्यावरील पादचारी, जॉगिंग किंवा सायकलस्वार अपघाताला बळी पडतात. या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि भरधाव वेगाने गाड्या चालवणाऱ्यांना कठोर शासन करावं अशी मागणी केली जात आहे.
मागील काही काळात गांधारी रिंगरोडवर झालेल्या अपघातांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात
18 फेब्रुवारी रोजी कल्याण पश्चिम येथील एका गॅरेज मालकाच्या दुचाकीला कल्याणमधील गांधारी येथील 90 फूट रोडवर रात्री 10 ते 11 च्या सुमारास एका भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीस्वाराच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून, आरोपी कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर गांधारी येथील पुलावर मागील वर्षी मे महिन्यात एका भरधाव डंपरने रिक्षेला धडक दिल्याने रिक्षा आणि डंपर दोन्ही गांधारी नदीत पडले होते. या अपघातात 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. नव्याने बांधण्यात आलेल्या या रिंग रोडवर रात्रीच्या वेळी तरुणांकडून कार रेसिंग आणि जीवघेणी स्टंटबाजी केली जात असल्याने इथे अपघात होतात असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
या मार्गावर अपघात होण्याची कारणं काय?
अपूर्ण काम आणि रस्ते: रिंग रोडचे काम पूर्ण होण्याआधीच काही वाहनचालक या मार्गाचा वापर करत आहेत. या मार्गावर जास्त वर्दळ नसल्याने वाहनांचा वेग नियंत्रणात नसतो.
वेग मर्यादा: गुळगुळीत रस्त्यांमुळे वाहने अतिवेगाने चालवली जातात आणि अपघात होतात.
डंपरसारखी अवजड वाहने: बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या डंपरमुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. डंपर चालक भरधाव वेगात डंपर चालवत असल्यानेही अपघात होतात.
