पैठण तालुक्यातील लोहगाव-७४ जळगाव फाटा परिसरात एका अवैध हातभट्टी अड्ड्याजवळ ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीने गावात दारूबंदीचा ठराव संमत केलेला असतानाही अवैध दारूची विक्री जोमाने सुरू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे अवैध धंद्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?
विष्णू बबन मोरे (रा. ढाकेफळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी पैठण तालुक्यातील ७४ जळगाव फाट्यावरील एका हातभट्टी अड्ड्याजवळ विष्णू मोरे मृतावस्थेत मिळून आला. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात, अतिमद्यप्राशन केल्यामुळे दुचाकीवरून पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने विष्णूचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हातभट्टीच्या अड्ड्याजवळच मृतदेह सापडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
शासकीय दुर्लक्षामुळे ठराव ठरला ‘फ्लॉप’
काही काळापूर्वीच ७४ जळगाव ग्रामपंचायतीने एकमताने गावात दारूबंदी करण्याचा ऐतिहासिक ठराव घेतला होता. मात्र, पोलिसांच्या आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे हा निर्णय केवळ कागदावरच राहिला. दारूबंदीसाठी आम्ही कंबर कसली होती, पण दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा अवैध विक्री सुरू झाली असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांचा जाब
बिडकीन पोलिसांनी सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र,कारवाई कोण करणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या परिसरात परमिट बार आणि शासनमान्य दुकाने असूनही गावठी हातभट्टीचा सुळसुळाट वाढला आहे. जोपर्यंत हे अवैध अड्डे कायमचे जमीनदोस्त होत नाहीत, तोपर्यंत असे बळी जातच राहतील, अशी भावना ढाकेफळ येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
