दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबियात भीषण विमान अपघात झाला आहे. कोलंबियाच्या हवाई दलाचं विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळलं. या अपघातात ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
कोलंबियाच्या दक्षिणेला असलेल्या पुटुमायो प्रांतात घडला. लॉकहिड मार्टिन सी-१३० हर्क्युलिस विमानानं सैनिकांना घेऊन उड्डाण केलं. यानंतर काही अंतरावर विमान कोसळलं. इक्वेडोर आणि पेरुच्या सीमेवर विमानाला अपघात झाला. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, विमानानं पुएर्ता लेगुइजामो परिसरातून उड्डाण केलं होतं. या विमानात ११४ सैनिक आणि ११ क्रू मेंबर होते.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर परिसरात धूर पसरला. मदत आणि बचाव कार्य तातडीनं सुरु करण्यात आलं. आतापर्यंत ५७ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. इतरांचा शोध सुरु आहे. कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेज यांनी अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पण या माहितीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
स्थानिक सरकारमध्ये सचिव असलेल्या कार्लोस क्लारोस यांनी आरसीएन टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत ३३ जणांच्या मृत्यूची माहिती दिली होती. अनेकांना जखमी अवस्थेत उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. विमानाच्या अपघातामागील कारणांचा शोध घेतला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
ज्या भागात विमान कोसळलं, तो सीमावर्ती भाग गेल्या काही आठवड्यांपासून सैन्य कारवायांच्या केंद्रस्थानी राहिला आहे. कोलंबिया आणि इक्वेडोरचं लष्कर अमली पदार्थांच्या तस्करी टोळ्यांशी दोन हात करत आहेत. या परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीची समस्या अतिशय मोठी आहे.
या अपघातानंतर कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी चिंता व्यक्त केली. सैन्याच्या उपकरणांच्या आधुनिकीकरणाला होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले. देशाची सुरक्षा आणि त्याबद्दलचं तंत्रज्ञान मजबूत करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
