रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप, राजीनामा दिला, आता पुढे काय? वादंगावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

महिलांवर अत्याचार करणारा नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे समोर आल्यानंतर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकर यांनी राजीनामा सोपवला आहे. त्यानंतर आज सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियातून याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत माहिती देताना सांगितलं की, “महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा काल मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती व सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष व पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे,” असं सुनेत्रा पवार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, एकीकडे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गमवावं लागलेलं असताना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही त्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार याबाबत काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चाकणकरांच्या अटकेची मागणी

रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असला तरी केवळ त्यांचा राजीनामा पुरेसा नसून बलात्कारातील आरोपी अशोक खरात याच्यासोबत चाकणकर यांचे आर्थिक हितसंबंध असून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. “रुपाली चाकणकर यांनी शब्दाची मलमपट्टी करून उगाच केविलवाणी धडपड करू नये. त्यांचा नुसता राजीनामा पुरेसा नाही. रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करावं. त्यांची अटक होणं जास्त गरजेचं आहे,” अशी भूमिका अंधारे यांनी मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *