‘समोरच्याचं पाप कपाळावर नसतं; आता नेत्यांनी बुरखा घालून फिरायचं का?’ खरात प्रकरणावर संजय शिरसाटांचा सवाल

राज्यात सध्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणावर शिवसेनेचे प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. “राजकारणात वावरताना अनेक लोकांशी संपर्क येतो, पण समोरच्याचे पाप त्याच्या कपाळावर नसते,” अशा शब्दांत शिरसाट यांनी नेत्यांची पाठराखण करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. अधिवेशनाचे कामकाज आटोपल्यानंतर मंत्री संजय शिरसाठ छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

“सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसोबत शेकडो लोक फोटो काढत असतात. त्यातील कोण खुनी आहे, कोण बलात्कारी आहे किंवा कोण काय उद्योग करतो, हे फोटो काढताना माहित नसते. जर केवळ फोटो काढल्यामुळे नेत्यांना राजकारण सोडावे लागणार असेल, तर उद्यापासून नेत्यांना मंत्रालयात बुरखा घालून फिरावे लागेल”, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी मांडली.

खरातचा ‘राम रहीम’ होणार”

अशोक खरात याच्या कृत्यावर भाष्य करताना शिरसाट यांनी त्याला कडक शासन होण्याची खात्री दिली. “खरातने जे काही केले आहे, तो नीचतेचा कळस आहे. या भोंदू बाबावर आता देव कोपला आहे. त्याचे कृत्य हे धर्माला लागलेला कलंक असून, त्याचे हाल ‘राम रहीम’ सारखे झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्याला अनेक वर्षे जेलमध्येच सडावे लागेल”, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी मांडली.

‘खरात प्रकरणामुळे नेते आता सावध झाले’

अशोक खरात याच्यासोबत राजकारण्यांच्या भेटीगाठींबाबत शिरसाट यांनी भूमिका मांडली. “आम्ही मंदिर, सप्ताह किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जातो. तिथे चांगल्या भावनेने जातो. पण तिथे जर काही चुकीचे घडत असेल, तर नेत्याला दोष देणे चुकीचे आहे. या प्रकरणामुळे आता सर्वच राजकीय नेते सावध झाले आहेत”, असं संजय शिरसाट म्हणाले.

जादूटोण्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया

“खासदार संजय राऊत म्हणतात की वर्षा बंगल्यावर लिंबू निघाले, जादूटोणा केला. जर जादूटोणा करून मुख्यमंत्री होता आले असते, तर मग लोकांकडे जाण्याची काय गरज होती? हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथे हे चालत नाही. उलट संजय राऊत हेच मोठे जादुगार आहेत, ज्यांनी ठाकरेंची सत्ता पालटली आणि अख्खा पक्षच बुडवून टाकला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, खरातला मदत करणाऱ्यांवर आणि या प्रकरणात भागीदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल”, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *