मिसेस देशपांडे’ फेम अभिनेत्रीच्या कॅबचा पाठलाग, दादरमधून दोघं ताब्यात, पोलीस स्टेशनमध्येच आई-बाप रडू लागले

मिसेस देशपांडे या वेब सीरीजमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली ३० वर्षीय अभिनेत्री निमिषा नायर हिच्या कॅबचा पाठलाग केल्याप्रकरणी दादरमधील दोघा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मंगळवारी पहाटे वर्सोवा येथील घरातून नरिमन पॉइंटला प्रवास करत असताना निमिषासोबत हा प्रकार घडला. पंचविशीतील दोघं तरुण प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी करतात.

मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजताच्या सुमारास अभिनेत्री निमिषा नायर कामानिमित्त दक्षिण मुंबईला जात असताना हा प्रकार घडला. निमिषाने इन्स्टाग्रामवर याविषयी माहितीही दिली होती. त्यानंतर खेरवाडी पोलिसात बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोघांचा माग काढत त्यांना नोटीस दिली.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमिषाने वर्सोवा येथील आपलं घर सोडल्यानंतर साधारण २० मिनिटांनी ही घटना घडली. तिची टॅक्सी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील खेरवाडी उड्डाणपुलावर एका स्कूटरच्या पुढे गेली. त्यानंतर त्या स्कूटरवरील चालक आणि मागे बसलेल्या व्यक्तीने टॅक्सीचा पाठलाग केला, तिला समोरुन अडवलं आणि टॅक्सी चालकाला शिवीगाळ केली. त्या दोघांनी वेगाने पळ काढण्यापूर्वी टॅक्सीत मागे बसलेल्या निमिषाने या घटनेचं चित्रीकरण केलं होतं.

“त्या दोघांनी दावा केला की, आमच्या स्कूटरला घासून गाडी नेणाऱ्या टॅक्सी चालकालाच केवळ त्यांनी शिवीगाळ केली. प्रवासी महिलेला काहीही केलं नाही. एफआयआर दाखल झाल्यानंतर काही वेळातच या प्रकरणाचा छडा लागला” असं खेरवाडी पोलिसांमधील एका अधिकाऱ्याने सांगितलं. आरटीओकडून मिळालेल्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने पोलिसांनी त्यांचा माग काढला.

पालक रडायला लागले

ते दोघे आपापल्या पालकांसह पोलीस ठाण्यात आले होते. जवळपास दिवसभर ते तिथेच होते. त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आलं. “आपल्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचं समजताच संशयितांच्या पालकांनी रडायला सुरुवात केली. आम्ही त्यांना सांगितलं की, रस्त्यावर वाद घालण्याऐवजी त्यांनी थेट पोलीस ठाण्यात यायला हवं होतं” असं त्या अधिकाऱ्याने नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *