नाशिक सिन्नरमधील मिरगाव येथील राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला अत्याचाराच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. अशोक खरातच्या अटकेनंतर बरेचसे राजकीय कनेक्शन समोर आले आहेत. स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या भोंदू अशोक खरातचे 58 आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले होते. पण या प्रकरणाने आता ट्विस्ट घेतला आहे. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंच्या चौकशीत मोठी माहिती हाती लागली आहे.
तेजस्वी सातपुतेंच्या चौकशीत काय आढळलं?
नाशिक सिन्नरमधील तथाकथित विकृत भोंदूबाबाची लाजिरवाणी कृत्य आता महाराष्ट्रासमोर येत आहेत. सुरुवातीला या कॅप्टन अशोक खरातचे तब्बल 58 अश्लील व्हिडिओ समोर आले होते. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंच्या चौकशीत कॅप्टन खरातचे 100हून अधिक अत्याचाराचे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचं समोर आलं आहे. तेजस्वी सातपुते दीड तासांपासून तपास अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेत आहेत. खरताच्या घराच्या झडतीत पिस्तुल, लॅपटॉप, 8 लाखांची रोकड मिळालं असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचदरम्या, त्याच्या मालमत्तांची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा आणि स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणविणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ज्योतिष व्यवसायातून त्याने अनेकांना गंडा घातल्याचा आरोप असून, त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडीओ आढळले आहेत. गुन्हे शाखेने खरातला अटक केली असून, या प्रकाराने हायप्रोफाइल वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोण आहे अशोक खरात?
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री. ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. त्याचं खरं रुप समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
