बोरिवली ते गोराई रो-रो फेरीच्या मार्गावर एका नव्या जेट्टीचं काम सुरू आहे. या मार्गावरून सध्या अनेक व्यावसायिक, कर्मचारी आणि पर्यटक गोराई खाडी ओलांडून जातात. वाढत्या प्रवासी संख्येमुळे नव्या जेट्टीची सुरूवात करणे गरजेचं आहे. पण सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे अनेक नागरिकांचा त्रास वाढला आहे. त्यासोबतच सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत
सध्या बोरिवली ते गोराई प्रवासाला 1 ते दीड तास लागतो. या नव्या रो-रो जेट्टीमुळे प्रवास केवळ 15 मिनिटांत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही नवी जेट्टी सोयीची ठरणार आहे. बोरिवली ते गोराई रो-रो फेरीने मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. तसेच, भाडे केवळ 10-15 रुपये असल्यामुळे पर्यटकांसह कर्मचाऱ्यांसाठीही हा खिशाला परवडणारा मार्ग ठरतो आहे. पण प्रवासात भरपूर वेळ खर्च होतो. त्यामुळे या नव्या रो-रो फेरीला मंजुरी मिळाली होती. या नव्या फेरीसाठी जेट्टीचं काम सुरू आहे. हे पूर्ण होताच प्रवाशांना मोठी जागा उपलब्ध होणार आहे.
सध्या या जेट्टीचं बांधकाम सुरू आहे. गेल्या वर्षी फेरीच्या वाहतुकीवर देखरेखीसाठी काही कर्मचार्यांची नियुक्ती केली होती. फेरीवरती प्रवासी आणि वाहनांची गर्दी होऊ नये या गोष्टीवरती लक्ष ठेऊन सर्व प्रवासी लाइफ जॅकेट घालून प्रवास करतील याची खात्री करून घेणं त्यांचं काम होतं. पण गेले अनेक दिवस असे सुरक्षारक्षक जेट्टीवर उपस्थित नाहीत अशी माहिती काही प्रवाशांनी ‘मिड डे’शी बोलताना दिली आहे. यामुळे गर्दीवर नियंत्रण राहत नसून अनेक प्रवासी लाइफ जॅकेट शिवाय प्रवास करत असल्याचा त्यांनी यावेळी दावा केला आहे.
बांधकामामुळे अरुंद जागा
दरम्यान, नव्या जेट्टीच्या बांधकामामुळे या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. बांधकामामुळे जेट्टी अरुंद झाली असून फेरीपर्यंत रुग्णवाहिका पोहचवणं कठीण झालं आहे. त्यात वीकेंडदरम्यान, वाहन आणि प्रवाशांची गर्दी वाढली की सुरक्षारक्षक नसल्यामुळे नियंत्रण ठेवणं अशक्य होतं. यामुळे फेरीवरून प्रवास करताना अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच, रुग्णवाहिकेला अरुंद मार्गामुळे फेरीपर्यंत जाता आले नाही तर रस्तेमार्गे प्रवास करावा लागेल. भाईंदरमार्गाने जाताना वाहतूक कोंडीमुळे प्रवासात बराच वेळ खर्च होतो.
दरम्यान, एका अधिकाऱ्याने मिड डे सोबत याबद्दल बोलताना सांगितले की चार ते पाच दिवसांत यावरती उपाय काढून प्रवाशांसाठी मार्ग मोकळा करण्यात येईल. तसेच, प्रवाशांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि प्रवास सुरक्षित होईल याकडेही लक्ष दिले जाईल.
