पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयात डॉ. अनुजा कुलकर्णी (४४) या महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला. बुधवारी ही घटना उघडकीस आली. प्राथमिक तपासामध्ये डॉक्टर महिलेने आयुष्य संपवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कान, नाक, घसा विभागात सेवा देणाऱ्या डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्यामार्फत बुधवारी काही शस्त्रक्रिया नियोजित होत्या. मात्र त्या शस्त्रक्रिया विभागात हजर न झाल्याने अन्य डॉक्टर, परिचारिकांनी त्यांना मोबाइलवर आणि त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
जमिनीवर पडलेल्या आढळल्या
त्या प्रतिसाद देत नसल्याने एका कर्मचाऱ्याने त्यांचे कार्यालय गाठले. ते आतून बंद होते. त्याने अनेकदा दार ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्याने काचेतून डोकावून पाहिले, तेव्हा अनुजा जमिनीवर पडलेल्या दिसल्या.
मृत्यूचं नेमकं कारण अस्पष्ट
दार फोडून आत गेलेल्या अन्य डॉक्टरांनी तपासले असता त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच नागपाडा पोलिस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी अनुजा यांचे पार्थिव ताब्यात घेऊन ते शवविच्छेदन करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले. तपासणीत संशयास्पद असे काही आढळले नसले, तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
