एशियाटिकची निवडणूक स्थगित; पात्र उमेदवारांच्या याद्या तयार करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

आज, शनिवारी होणारी द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक अवघ्या १६ तासांवर असताना धर्मादाय आयुक्तांकडून निवडणूक स्थगित करण्याबाबत निर्णय आल्याचे एशियाटिकच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

धर्मादाय आयुक्तांनी गुरुवारी निवडणूक अधिकारी प्रसाद अकोलकर यांना प्रत्यक्ष किंवा वकिलाच्या माध्यमातून हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या सुनावणीनंतर संकेतस्थळावर याद्याही करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला होता. मात्र, दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास धर्मादाय आयुक्तांकडून काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद अकोलकर यांनी दिली. या निवडणुकीसाठी के. डी. तळोकर यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तळोकर यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२७च्या कालावधीसाठी निवडले गेलेले द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या संस्थेचे पदाधिकारी मंदार भारदे, विवेक गणपुले, कुमार केतकर, सुरेंद्र कुलकर्णी आणि प्रा. सूरज पंडित दैनंदिन प्रशासकीय कारभार पाहतील. केतकर आणि गणपुले निवडणुकीला उभे असल्याने मतदारयाद्या तयार करण्याच्या कामात हे दोघेही सहभागी नसतील, असेही या निर्देशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तळोकर, भारदे, कुलकर्णी आणि प्रा. पंडित यांची उपसमिती २०२५च्या निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी तयार करतील, असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *